दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मंनधरणे
देगलूर तालुक्यातील हाणेगाव ते शिळवणी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग सध्या पूर्णपणे खड्ड्यांत गेला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील या दुर्गम भागातील हा मुख्य दळणवळणाचा मार्ग उखडून गेल्याने खड्डे, चिखल आणि उखडलेला डांबर थर यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विशेषतः आश्रम शाळेतील लहान विद्यार्थी प्रवास करतात. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज या धोकादायक रस्त्यावरून जावे लागत असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एवढे गंभीर वास्तव असतानाही संबंधित यंत्रणा मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे.
औराद येथील सोमवारी भरणारा बाजार तसेच मुख्रामाबाद येथील साप्ताहिक बाजारासाठी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत असून, अनेकदा अपघाताची भीती व्यक्त होत आहे. तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या भागात पर्यायी रस्त्यांची सुविधा नसल्याने नागरिकांना याच मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची पूर्तता होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, शिळवणी हे अनेक राजकीय नेत्यांचे गाव असून, येथील या दुरवस्थेमुळे त्या नेत्यांचा गावांशी संपर्कही बाधित झाला आहे. या मार्गाची तात्काळ दुरुस्ती न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा जि.प.चे माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख शिळवणीकर यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जागे होऊन या मार्गाचे काम हाती घ्यावे, अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे.
