इगतपुरी प्रतिनिधी :-श्री.विकास पुणेकर
इगतपुरी :- अंधश्रद्धेचा फायदा घेत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूगिरीचा आणखी एक प्रकार इगतपुरी तालुक्यात उघडकीस आला आहे. तळेगाव येथील दोन महिलांनी जादूटोण्याचा धाक दाखवत एका महिलेची ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिलांनी “तुझ्यावर नातेवाईकांनी करणी केली असून तुला बाधा झाली आहे” असा खोटा समज निर्माण केला. त्यावर उपाय म्हणून विविध पूजाविधी करण्याचा सल्ला देत, त्यासाठी मोठी रक्कम उकळली. तसेच रत्नखडे देऊन उपचार केल्याचा बनाव करण्यात आला.
मात्र, कोणताही परिणाम न दिसल्याने पीडितेने पैसे परत मागितले असता, आरोपी महिलांनी आक्रमक भूमिका घेत शिवीगाळ केली आणि गंभीर धमक्या दिल्या. “कोणाकडेही जा, तुला कोणीही बरे करू शकत नाही. आमच्या विरोधात गेलीस तर तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू,” अशा शब्दांत तिला धमकावण्यात आले.
या प्रकरणी वंदना रवींद्र गोसावी (वय ४०, रा. दत्तनगर, गिरणारे) यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी वैशाली किशोर बैरागी आणि रत्ना माळी (दोघीही रा. तळेगाव, ता. इगतपुरी) यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
