अचानक एंट्री झालेला हेमंत गावंडे आहे तरी कोण ?
पार्थ पवारांचं जमीन प्रकरण गाजतंय. यावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत, या प्रकरणात अनेक नावं समोर आली. यात आता एका माणसाची एन्ट्री झालीय, ज्याच्यामुळं भरपूर खाती असलेलं मंत्रिपद एकनाथ खडसेंना सोडावं लागलेलं, त्यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिलेला.
वर्ष 2016… जूनचा महिना, प्रचंड आरोप-प्रत्यारोपानंतर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला आणि हा राजीनामा खडसेंचं राजकीय करिअर संपवणारा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला.
खडसेंचा राजीनामा होण्यामागे कोण होतं? यावरुन राजकीय आरोप बरेच झाले, स्वतः खडसेंनी देखील यावर क्लिअॅरिटी दिली आहेच. मात्र एका व्यक्तिच्या तक्रारीमुळं खडसेंना घरी जावं लागलं. ही तक्रार खडसेंच्या राजीनाम्याचं कारण ठरलं. ही तक्रार होती हेमंत गावंडेंची. हेच हेमंत गावंडे ते व्यक्ती आहेत ज्यांनी यापूर्वी एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणात व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावली होती. त्यांच्या खुलाशांमुळे त्यावेळी खडसेंचं मंत्रीपद गेलं होतं. आता हेच गावंडे पार्थ पवार प्रकरणात देखील चर्चेत आलेत. आणि त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण देखील लागण्याची शक्यता आहे. यामुळं खडसे देखील समोर आलेत आणि त्यांनी धक्कादायक आरोप केलेत.
एकंदरीतच पार्थ पवार प्रकरणात गावंडेंची एन्ट्री काय सांगतेय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ अजित पवार या नावाची चर्चा आहे. पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजत आहे. 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना कशी मिळाली? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप केले गेलेत आणि हा व्यवहार रद्द झाला असल्याचं देखील समोर आलंय. पण व्यवहार रद्द झाला म्हणजे प्रकरण संपलं असं नाही, याचे वेगवेगळे पदर आता समोर येत आहेत आणि येतील सुद्धा.
यातच हेमंत गावंडेंची एन्ट्री होते. पुण्यातल्या बोपोडी परिसरातील जमीन घोटाळ्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या यादीत तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, जमीन विक्रेती शीतल तेजवानी तसेच बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे. गावंडेंच्या ‘व्हिजन प्रॉपर्टीज’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडीया कंपनी’ या संस्थांवर राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सुमारे साडेपाच हेक्टर जागेवर अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय.
हेमंत गावंडे यांचं नाव प्रकरणात येताच एकनाथ खडसे शांत बसतील असं कसं शक्य. लागलीच एकनाथ खडसेंनी गावंडेंची कुंडलीच काढली आणि भयंकर गौप्यस्फोट केले. शिवाय आपलं ऐकलं असतं तर आज अशी प्रकरणंच बाहेर आली नसती असा दावाही केलाय.
खडसेंनी जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा कच्चाचिठ्ठाच समोर आणला. पुण्यात खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. यामधे सर्व्हे 62 बोपोडी पुणे येथील जमिनीचा आहे. बनावट कागदपत्र तयार करून ही जमीन नावावर केली गेली. पेशवे यांची ही जमीन होती. भट आणि विध्वंस यांना उदर निर्वाहासाठी पेशव्यांनी ती जमीन दिली होती. 1883 पासून ही जमीन सरकार जमा झाली.
कृषी विभागाच्या ताब्यात ही जमीन होती. महत्वाच्या अशा शिवाजी नगर येथे ही जमीन आहे. 1500 कोटी रुपयांची ही जमिनी आहे. बनावट कागदपत्र तयार करुन ही जमीन हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुखत्यार पत्र तयार करून जमिनीची मागणी केली होती. मात्र सरकारने नाकारली होती, असा आरोप खडसेंनी केलाय.
2014 मध्ये या जमिनीवर टीडीआर मिळावा यासाठी पुणे मनपाकडे या लोकांनी अर्ज आला. 2014 मध्ये रवींद्र बरहाते यांनी हा प्रकार माझ्या निदर्शनास आणून दिला होता. त्या वेळी आपण टीडीआर मंजूर करण्यास नकार दिला. आपण आणि फडणवीस यांनी विधानसभेत हा विषय मांडला होता. आपण विरोधी पक्षात होतो. ही जमीन सरकारची असल्याने आपण विरोध केला होता. आपण कृषी मंत्री झाल्यावर ही जमीन हडप होत असल्याचे लक्षात आले.
बनावट कागदपत्र केल्याप्रकरणी 2015 हेमंत गावंडे यांच्या सह काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता दाखल गुन्ह्यात देखील हेच आरोपी आहेत. हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला आपण विरोध केला म्हणून हेमंत गावंडेनी भोसरी प्रकरणात आपल्या विरोधात तक्रार केली. मधल्या काळात 2019 मध्ये सरकार बदलले. उद्धव ठाकरे यांचे सरकार येताच ही फाईल पुन्हा पुढे केली. मात्र, ही फाईल रिजेक्ट करण्यात आली, असंही खडसेंनी म्हटलंय.
2015 मधील आपल्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात चौकशी झाली असती तर पुढे गुन्हे झाले नसते. मात्र त्याच्या पाठीशी कोणीतरी असल्याने त्याच्यावर कारवाई झाली नाही. सरकारने या प्रकरणाने सहकार्य केले नाही. सरकारने ‘जैसे थे’चा निर्णय घेतला. हेमंत गावंडे आणि शीतल तेजवानीने विध्वंस यांच्या नावाने पॉवर ऑफ अटॉर्नी केली. आपण विरोध केला होता म्हणून भोसरी प्रकरण आपल्या विरोधात पुढे आले.
येवले नावाच्या तहसीदाराने ही जमीन त्यांची असल्याचे दाखवून आपल्या पदाचा गैर वापर केला. मालक आणि कब्जेदार म्हणून हेमंत गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावून घेतली. सगळे बेकायदेशीर रित्या केले गेले. दिग्विजय पाटील, अमर सिंग पाटील याचे ही नाव यात आहे. पवार यांच्या अमेडीया कंपनीमध्येही याचे नाव समोर आले आहे. दोन महिन्यापूर्वी येवले या तहसीलदाराला निलंबित केले असते तर आता हे व्यवहार झाले नसते. शीतल तेजवानी आणि हेमंत गावंडे हे क्रिमिनल आहेत. त्यांच्या पाठीशी कोणीतरी असल्याने या तहसीलदारावर आतापर्यंत कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे केलाय.
आता या प्रकरणात नाव समोर येताच आणि खडसेंचे आरोप होताच गावंडे पुढे आलेत. त्यांनी आपला आणि अमेडिया कंपनी, पार्थ पवार, दिग्विजय पाटील किंवा शितल तेजवानी यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीनूसार गुन्हा दाखल झाल्याचंही ते म्हणत आहेत. बोपोडी जमीन ही माझ्या कायदेशीर मालकीची आहे असून कोणालाही विकलेली नाही किंवा विक्रीस मान्य केलेली नाही. या जमिनीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचं आरक्षण असून कोणताही तिसऱ्या पक्षाचा हक्क नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप संपूर्णपणे चुकीचा आहे, असं गावंडे म्हणताहेत.
खडसेंच्या आरोपांवरही गावंडे बोललेत. खडसेंचे महसूल मंत्री पद फक्त भोसरी जागा फसवणूक प्रकरणी नाही तर ,माझ्यावर केलेल्या खोट्या आरोपांबद्दल गेलेलं आहे, असं ते म्हणाले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत,नाहक आरोप केले,25 ते 30वर्ष काम करत आहेत,माझी बदनामी झाली आहे. 2009 ला या जागेचा व्यवहार झाला आहे. या जागेत अमेडिया कंपनी कशी आली हेच माहिती नाही,असा दावा सुद्धा गावंडे करताहेत.
तहसीलदाराला अटक करून त्याची नार्को टेस्ट केली तर यात कोण सहभागी आहे हे समोर येईल. आपल्या काळात फडणवीस आणि आपण या विरोधात आवाज उठविला होता. आता फडणवीसांनी यात लक्ष घातले पाहिजे, असं खडसेंचं म्हणणं आहे. 2015 मध्ये हेमंत गावडे याच्या विरोधात झालेल्या गुन्ह्यात कारवाई झाली नसल्याने त्याची हिंमत वाढली, असं खडसेंचं म्हणणं जर खरं असेल तर सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी निश्चितच यावर विचार करणं गरजेचं आहे.
एकंदरीतच जमीन गैरव्यवहार प्रकरणं नवी नाहीत. असे अनेक आरोप-प्रत्यारोप याआधीही झालेले आहेत आणि भविष्यातही होत राहतील. खडसेंच्या आरोपांनी निश्चितपणानं बरेच प्रश्नचिन्हं उपस्थित झाली आहेत. आता त्यात तत्थ्य किती आहे हे तपासातच समोर येईल. बाकी या प्रकरणात गावंडेंच्या एन्ट्रीनं वेगळं वळण मिळालंय आणि बरेच सवाल देखील उपस्थित होत आहेत. याची उत्तरं भविष्यात मिळतील अशी अपेक्षा सामान्य नागरिक करत आहेत.


