मविआचं टेन्शन वाढलं !
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्य निवडणूक आयोग नगरपंचायत, नगरपरिषदेसोबतच राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचीही घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने ही घोषणा केली नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2025 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळेच मुंबई तसेच इतर शहरांच्या महापालिकांच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता एमआयएम या पक्षाने मोठी घोषणा करून मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एमआयएम मुंबईच्या पालिका निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवणार आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
ऑल इंडिया मजलीस इत्तेहाद उल मुसलमीन अर्थात एआयएमआयएम हा पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. तशी घोषणाच एमआयएमचे मुंबईचे अध्यक्ष फरुख मक्बुल शब्दी यांनी केली आहे. त्यांच्या माहितीनुसार एमआयएम कमीत कमी 50 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आपल्या पक्षाची पुढीर रणनीती काय असेल, याबाबतही माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेसाठी नुकतेच आरक्षण सोडत जाहीर झाली. एससी, एसटी, ओबीसी पवर्गांसाठी काही प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. तरीदेखील आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. कमीत कमी 50 जगा लढवण्याची आमची तयारी आहे, असे हाजी फारुख मक्बुल शाब्दी यांनी सांगितले.
आयारामांचा नंतर विचार केला जाणार
तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्यास आमचे प्राधान्य असेल. निवडणूक लक्षात घेऊन पक्षात आलेल्यांचा आम्ही नंतर विचार करू, असेही शाब्दी यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी फटका कसा भरून काढणार?
एमआयएम हा भाजपाची बी टीम आहे, असा आरोप नेमही होतो. हा पक्ष मुंबई पालिकेची निवडणूक लढणार असेल तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपा, शिंदे यांची शिवसेना यांनाच होऊ शकतो. याबाबत विचारले असता. आमच्यावरील भाजपाची बी टीम हा आरोप काही नवा नाही. परंतु आम्ही आमच्या ताकदीवर ही निवडणूक लढवणार आहोत, असे शाब्दी यांनी सांगितले. दरम्यान, एमआयएमने मुंबई पलिका निवडणूक लढवण्याचे ठरवल्यामुळे त्याचा फटका आता महाविकास आघाडीली बसू शकतो. हा फटका महाविकास आघाडी कसा भरून काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


