दानवेंच्या दाव्याने खळबळ…
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन खरेदी व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बावधन पोलिसांनी पार्थ पवार यांना वगळत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आणि वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर जमीन व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली होती. असे असले तरी अद्यापही हा जमीन व्यवहार रद्द झालेला नाही. त्यामुळे विरोधक महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांबाबत केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
अंबादास दानवे यांनी आज (13 नोव्हेंबर) X या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पार्थ पवार जमीन व्यवहाराबाबत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘काका मला वाचवा’ असा उल्लेख केला आहे. यासंदर्भात अंबादास दानवे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, याप्रकरणी शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अतियश बोलकी आहे. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा पार्थ पवार यांना कसं वाचवता येईल. कारण या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवताच येणार नाही. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाही, असे म्हणत दानवे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या बैठकीचा उल्लेख करत अंबदास दानवे यांनी दावा केला की, वर्षा बंगल्यावर ज्या बैठका झाल्या, त्याबद्दल मला बोलायला वेळ मिळाला नाही. पण त्या बैठकांमध्ये अजित पवारांनी त्वेशाने आणि रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो, अशी भूमिका घेतल्याचे माझ्या कानावर आहे. माझ्यावर कानावर जे आले आहे, तेच मी बोलत आहे. यासंदर्भात खरं खोटं बाहेर येईलच. पण अशा कारणाने पार्थ पवारांना वाचवलं जातंय, असं मला वाटत असल्याचा दावाही दानवे यांनी केला.
दरम्यान, अंबादास दानवे यांना विचारण्यात आले की, तुम्ही आता जो आरोप केला आहे, तर याच कारणाने भाजपाने हे सर्व केलं आहे, असं खरंच तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर अंबादास दानवे म्हणाले की, याच कारणाने होत आहे. कारण भाजपाला माहित होतं की, हे सर्व होणार आहे आणि भाजपाला हे सर्व होणार असे ज्ञात होतं. तसेच हे सर्व करून अजित पवार यांना अडचणीचं आणण्याचा त्यांचा उद्देश आहे. एकीकडे कारवाई करायची आणि नंतर सारसारव करायची, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे. अजित पवार यांची आता फाईल तयार झाली आहे. त्यामुळे उद्या जर काही अजित पवार यांनी केलं तर पार्थ पवार यांना एक मिनिटात अटक होऊ शकते. भाजपाचं हे षडयंत्र आहे, असा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला.


