महसूलमंत्री इन-अॅक्शन मोड; मोठा निर्णय…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील अमेडीया कंपनीच्या जमीन घोटाळ्याने प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातून आणखी एक जमीन घोटाळा प्रकरण समोर आलं आहे.
या बातमीने आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली असून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर तात्काळ कारवाई करत गैरव्यवहार प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधकाला निलंबीत करण्यात आलं आहे.
पुण्याच्या हवेलीतील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे सांगळे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पुण्यातील पशुसंवर्धन विभागाच्या 15 एकरच्या जमीन गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबनाचा आदेश दिला आहे. बावनकुळेंकडून महसूल विभागाची झाडाझडती घ्यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
पुणे जिल्ह्यातल्या ताथवडे गावातल्या शासकीय मालकीच्या ताब्यातील जमीन विक्रीस नोंदवण्याच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी प्रभारी दुय्यम निबंधक विद्या शंकर बडी (सांगळे) याना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात ताथवडे येथील सर्वे नं. 20 मधील 6 हेक्टर 32 आर क्षेत्राची जमीन विक्रीचा दस्त क्रमांक 685/2025 दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी नोंदवण्यात आला होता. मात्र, नोंदणी करताना अद्ययावत 7/12 उतारा जोडला नव्हता. दस्तासोबत 2023 मधील जुना 7/12 जोडण्यात आला होता, ज्यावर शासनाचा ताबा किंवा विक्रीवरील बंदीचा उल्लेख नव्हता.चौकशीत समोर आले की फेब्रुवारी 2025 मधील अद्ययावत 7/12 उताऱ्यावर आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असून शासनाच्या परवानगीशिवाय विक्रीस बंदी” असा स्पष्ट शेरा होता. तरी देखील दुय्यम निबंधकांनी तांत्रिक अडचणीमुळे म्युटेशन होत नव्हते म्हणून ‘स्किप ऑप्शन’ वापरून दस्त नोंदविला. परंतु यासाठी त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतलेली नव्हती.


