जमखंडी : उसाला महाराष्ट्राप्रमाणे दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुधोळ तालुक्यात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला आज गालबोट लागलेे. संतप्त शेतकर्यांनी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली.
यात तीसहून अधिक ट्रॅक्टर व 100 ट्रॉली, दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यावेळी तुफान दगडफेक झाल्याने अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुखांसह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी, मुधोळ तालुक्यातील सैदापूर गावापासून जवळ असलेल्या समीरवाडी येथील गोदावरी बायो रिफायनरी साखर कारखान्याचे मालक चर्चा करण्यासाठी येत नसल्याचा राग शेतकर्यांमध्ये होता. याविरोधात आंदोलन करण्याचे हेतूने शेतकरी रिकामे ट्रॅक्टर घेऊन कारखान्याला घेराव घालण्यासाठी जात होते. सकाळपासून शांत पद्धतीने आंदोलन सुरू होते. पण, सायंकाळी आंदोलन चिघळले आणि रस्त्यावर असलेल्या चार उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. त्यानंतर कारखान्याच्या आवारात असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना शेतकर्यांनी आग लावली. बघता बघता या आगीमध्ये सुमारे 30 हून अधिक ट्रॅक्टर व 100 ट्रॉली जळून खाक झाल्या आहेत. याठिकाणी असलेल्या अनेक दुचाकीदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. यामुळे संपूर्ण कारखान्याच्या आवारात आगीचे लोट पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तुफान दगडफेक करण्यात आली.
अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख गंभीर जखमी
यावेळी झालेल्या दगडफेकीत बागलकोट अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख महांतेश्वर जिद्दी यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख महांतेश्वर जिद्दी गंभीर जखमी झाले असून, त्यांचा एक पाय तुटला असून, त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
तीन तालुक्यांमध्ये 144 कलम लागू
पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. बागलकोट जिल्हाधिकार्यांनी जमखंडी, मुधोळ, रबकवी बनहट्टी या तालुक्यांमध्ये पुढील तीन दिवसांसाठी 144 कलम लागू करून संचारबंदी लागू केली आहे.
शेतकर्यांकडून नव्हे समाजकंटकांकडून कृत्य : साखर मंत्री
सदर आंदोलनात शेतकर्यांनी आग लावलेली नसून, हे समाजकंटकांचे काम आहे. शेतकरी कधीही दुसर्या शेतकर्याच्या उसाला आग लागत नाही. शेतकर्यांकडून हे कृत्य झाल्याचा मला विश्वास नाही. समाजकंटकांकडून हे कृत्य झाले असून, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील सांगितले.
भाजप नेत्यांमुळेच घटना : मंत्री ईश्वर खंड्रे
बेळगाव जिल्ह्यात झालेल्या ऊस आंदोलनानंतर राज्य सरकारने 3300 रुपये दर देऊन आंदोलन मागे घेण्यास लावले. भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्यासह भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे आंदोलनाला गालबोट लागल्याचा आरोप खंड्रे यांनी केला आहे
बेळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या आंदोलनानंतर कर्नाटक सरकारने उसाला प्रति टनाला 3300 दर जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यामुळे सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. दुसरीकडे बागलकोट जिल्ह्यात मात्र सदर दर आम्हाला मान्य नसून 3500 रुपये दर द्यावा यासाठी मुधोळ येथे आंदोलन सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची माहिती जिल्हा पालकमंत्री आर. बी. तिम्मापूर व साखरमंत्री शिवानंद पाटील यांच्याकडून घेतली. तसेच सदर घटनेविषयी चौकशीचे आदेश दिले आहेत.


