रुग्णवाहिका चालक म्हणाला; मी कधी इतकं भयंकर…
पुण्यातला नवले पुल खरच ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली त्यानंतर अपघातग्रस्त गाडीने पेट घेतला.दुर्घटनेत होरपळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने सिंहगड रोड केंद्रातून घटनास्थळी रवाना झाले. जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु आग विझवल्यानंतर समोरचे दृश्य पाहून अनेकांचे मन सुन्न झाले. आग विझल्यानंतर अपघाताची भीषणता समोर आली.
कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता आणि ती ट्रकखाली दबली होती. कारमधून दोन पुरुष, दोन महिला आणि लहान मुलीसह एकूण पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. याव्यतिरिक्त, ट्रकमधूनही दोन मृतदेह काढण्यात आले.
हा अपघात किती भयानक होता, अपघाताची भीषणता आणि मृतदेहाची अवस्था पाहून प्रत्यक्षदर्शीं रुग्णवाहिका चालकाने सांगितले कि , “मी अनेक अपघात पहिले, पण या अपघातातील मृतांची अवस्था पाहून मन हेलावून गेले. असा प्रसंग पुन्हा कोणावर येऊ नये, एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.
नवले पुलावर झालेल्या या दुर्दैवी घटनेने पुणेकरांना पुन्हा एकदा विचार करण्यास लावले आहे. 8 जणांचा जीव घेणारा हा अपघात, केवळ ब्रेक फेल किंवा चालकाची चुकीमुळे झाला असे सांगून चालणार नाही, तर या ‘मृत्यूच्या सापळ्या’वर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आता गरज आहे. नाहीतर भविष्यात अनेकांना जीव गमवावा लागेल.


