बिहारमध्ये NDA ला यश; महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले…
बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा आज (१४ नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे.
२४३ विधानसभा जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, एनडीए आघाडीला घवघवीत यश मिळालं असल्याचं स्पष्ट होतंय. एनडीएच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज दुपारी १ वाजता जिल्हास्तरावर विजयोत्सव साजरा करण्याची घोषणा केली.
बिहारमध्ये एनडीएचे सरकार जवळपास येणार हे निश्चित झालंय. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. एकूण आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्षाला ९० जागांमध्ये यश मिळालं आहे. तर, जनता दलाने (संयु्क्त) ७९ जागांवर बाजी मारली. एलजीपी (चिराग पासवन) २० जागांनी आघाडीवर आहे.
दरम्यान, मतमोजणी सुरू असतानाच एनडीएने घौडदौड घेतल्यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही बिहारमधील या यशानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत पेढे वाटत उत्सवाचा माहोल तयार केला. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण सुरू असताना बिहारच्या विजयामुळे भाजप नेत्यांनी, ‘बिहार चुनाव तो झाकी है, मुंबई महानगरपालिका बाकी है’, असा नारा दिला.
आमदार भातखळकरांकडून जल्लोष साजरा
मुंबईच्या कांदिवली परिसरात आमदार अतुल भातखळकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल जल्लोष साजरा केला. एकमेकांना मिठाई भरवत त्यांनी विजयोत्सव साजरा केला. डीजेच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांसह भातखळकरांनी जल्लोष साजरा केला. यावेळी भातखळकरांनी ‘बिहार चुनाव तो झाकी है, मुंबई महानगरपालिका बाकी है’, असं म्हणत ठाकरे बंधुंना इशारा दिला.
नागपुरात विजयाचा गुलाल उधळला
बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या विजयाबद्दल नागपूरात भाजप युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. भारत माता चौकात फटाके फोडून भारत मातेला पुष्पहार अर्पण करून, त्यांनी जल्लोष साजरा केला. भारत माता चौक परिसरात बिहारी लोकांचे वास्तव्य असल्याने, भाजप कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला.
सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटलांकडून विजयोत्सव साजरा
बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या यशानंतर सांगलीमध्ये भाजपच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला. उरूण इश्वरपूर या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावेळी लाडू वाटप करत भाजपाने मिळवलेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
हिंगोलीत भाजपकडून फटाके फोडून जल्लोष
बिहारच्या निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाल्याने, हिंगोलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे. हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात ढोल ताशाच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी देखील केली होती. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अमित शहांच्या नावाने विजयी घोषणा देखील देण्यात आल्या.


