नवऱ्याकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुनीता अहुजाच्या मनातलं आलं बाहेर !
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने काही दिवसांपूर्वीच युट्यूबवर तिचं चॅनल सुरू केलं. या चॅनलवर ती सतत व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
यावेळी नेटकऱ्यांनी सुनीताला गोविंदाच्या प्रकृतीबद्दलही प्रश्न विचारला. घरात चक्कर येऊन पडल्याने गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. गोविंदा आता एकदम फिट असल्याचं तिने सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये ती पतीच्या फसवणुकीबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली आहे. एका नेटकऱ्याने तिला याबद्दल प्रश्न विचारला होता.
“गोविंदाने माफी मागितल्याचं आवडलं नाही”
“गोविंदाने हात जोडून माफी मागितली आहे, जे मला अजिबात आवडलं नाही. चिचीने कधीच कोणासमोर माझ्यासाठी हात जोडावेत, हे मला अजिबात आवडणार नाही. मी कोणाचंच नाव घेतलं नव्हतं. माझ्यासोबत जे घडलं होतं, त्याबद्दल मी सांगितलं होतं. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी प्रत्येक सिद्धपीठाच्या गुरुजींची मी हात जोडून माफी मागते. गोविंदाकडे तीन-तीन पंडित आहेत. त्यांना स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नव्हती. मला फार वाईट वाटलं,” असं ती म्हणाली.
पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये सुनीताने एका फसवणूक करणाऱ्या पंडिताबद्दल सांगितलं होतं. “माझ्याही घरात एक असे पंडित आहेत, जे दरवेळी नवीन पूजा करायला सांगतात आणि लाखो रुपये उकळतात”, असं ती म्हणाली होती.
गोविंदाच्या प्रकृतीविषयी दिली अपडेट
गोविंदाच्या प्रकृतीविषयी तिने सांगितलं, “गोविंदा एकदम फिट आहे. तो त्याच्या नव्या ‘दुनियादारी’ या चित्रपटासाठी प्रमाणापेक्षा जास्त वर्कआऊट करत होता. मी इथे नव्हते, त्यामुळे मला आता त्याबद्दल समजलंय. मी त्याची मुलाखतसुद्धा पाहिली आहे. अधिक वर्कआऊट केल्यामुळे त्यांना थकवा आला होता. पण आता तो फिट आहे. त्यामुळे काळजी करू नका.”
पत्नीच्या फसवणुकीबद्दल काय म्हणाल्या?
मी कोणत्या मंदिरात जाऊ, जेणेकरून माझी पत्नी माझ्यावर कमी संशय घेईल? असा सवाल एकाने तिला विचारला. त्यावर उत्तर देताना सुनीता म्हणाली, “तुम्हाला मंदिरात जायची काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत प्रामाणिक राहा. तुमच्या पत्नीला वेळ द्या आणि तिच्यावर प्रेम करा. तिला फिरायला घेऊन जा, तिच्या सर्व इच्छा पूर्ण करा. याने तुमचा शुक्रसुद्धा बलवान होईल आणि पत्नीसुद्धा खुश होईल. तुमचं कुटुंबही सुखी राहील. आयुष्यात कधीच तुमच्या पत्नीची फसवणूक करू नका, कारण जेव्हा पत्नीची हाय लागते, तेव्हा माणूस उंचावरून खाली पडतो.”


