ठाणे ग्रामीण प्रतिनिधी – विकी जाधव
ठाणे,दि.14(जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये निवडणूक प्रचार व प्रसिद्धी करिता वापरण्यात येणाऱ्या वस्तू व सेवांचे दर निश्चित करण्याकरिता आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामन्य प्रशासन) रुपाली भालके, तहसिलदार सचिन चौधर, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त नितीन आहेर, सहायक कामगार आयुक्त ठाणे चेतन जगताप, उप अभियंता (विद्युत) प्र.श.शिवदास, सहायक अभियंता (विद्युत) नि.ह. पगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी मन्यवर उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व राजकीय पक्षातील प्रतिनिधींशी या दरपत्रकाबाबत आपल्या काही सूचना असल्यास सूचविण्याचे आवाहन केले. त्याबाबत सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप यांनी निवडणूक कामी पुरविण्यात येणाऱ्या मनुष्यबळाच्या दराविषयी बोलताना सांगितले की, हे जुने दर असून नवीन दर काढण्यात आले असल्यामुळे नवीन दर आकारण्यात यावे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ढोल, ताशा पथकाच्या दर आकारण्याबाबत फेरविचार व्हावा, असे आवाहन केले. शेवटी सर्व सूचना समजून घेतल्यानंतर, निवडणूक खर्च दरपत्रकाबाबत फेरविचार करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.



