आम्हाला प्रचंड…
बिहारच्या निवडणुकीत एनडीएने मोठं यश मिळवलं आहे. भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जदयूला जवळपास २०० जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस आणि राजदचा सूपडा साफ झाला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एनडीए सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्यामुळे आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, बिहारच्या विजयाबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे आणि बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत.
नितीश कुमार काय म्हणाले?
‘बिहार विधानसभा निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत देऊन राज्यातील जनतेने आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी राज्यातील सर्व आदरणीय मतदारांना माझे आदरपूर्वक नमन, मनापासून कृतज्ञता आणि आभार. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो’, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
या निवडणुकीत एनडीए आघाडीने पूर्ण एकता दाखवली आणि प्रचंड विजय मिळवला. या प्रचंड विजयाबद्दल आमचे सर्व एनडीए सहयोगी चिराग पासवान, जितन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांचे आभार. तुमच्या सहकार्याने बिहार आणखी प्रगती करेल आणि देशातील सर्वात विकसित राज्यांच्या श्रेणीत समाविष्ट होईल’, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
बिहारच्या मुख्यमंत्री पदाबाबत जेडीयूचा दावा?
बिहारच्या मुख्यमंत्री पदाबाबत जदयूने दावा केल्याची माहिती समोर आली आहे. एनडीएला प्रचंड मोठं बहुमत मिळत असल्याचं दिसताच जदयूने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट करत थेट बिहारचं मुख्यमंत्री कोण होणार? हेच जाहीर करून टाकलं होतं. मात्र, त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या येताच काही वेळात जदयूने एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील ती पोस्ट डिलीट केली.
जेडीयूने काय पोस्ट केली होती?
“न भूतो न भविष्यती…, नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते आणि राहतील”, अशा आशयाची पोस्ट जदयूने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर केली होती. मात्र, या पोस्टमुळे एनडीएमध्ये खळबळ उडाली, त्यानंतर काही वेळात जदयूने ही पोस्ट डिलीट केली.
पंतप्रधानांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. सुशासनाचा विजय झाला आहे. विकासाचा विजय झाला आहे. जनकल्याणाच्या भावनेचा विजय झाला आहे. सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनता-जनार्दनांची सेवा करण्याची आणि बिहारसाठी नव्या संकल्पाने काम करण्याची ताकद देणारा आहे, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.


