बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे चर्चेतील चेहरा ठरले. मागील एक दशकाहून अधिक काळ त्यांनी निवडणुकीची रणनीती आखत अनेक राजकीय नेत्यांना सत्तेच्या सिंहासनावर आरुढ केले.
यानंतर त्यांनी पूर्णवेळ बिहारच्या राजकारणात उत्तरले. जन सुराज नावाच्या पक्षाची स्थापना करत विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी प्रचारही सुरु केला. मात्र निकालानंतर प्रशांत किशोर यांच्या पक्षाची पाटी कोरीच राहिली आहे. निकालावर त्यांनी प्रथमच भाष्य करत पुन्हा एकदा नितीश कुमारांना आव्हान दिले आहे.
… तर राजकारणातून संन्यास घेणार
पक्षाच्या पहिल्या निवडणूक लढतीत मोठा धक्का बसल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात किशोर यांनी संपूर्ण जबाबदारी घेतली. बिहारमध्ये सत्तेत बदल घडवून आणण्यास पक्ष असमर्थ असल्याचे मान्य केले. विधानसभा निवडणूक निकालापूर्वी मी नितीश कुमारांचा जनता दल संयुक्त (जेडीयू) हा पक्ष केवळ २५ जागा जिंकेल असे म्हटलं होते. आता याच विधानावर लोक टीका करत आहेत. मात्र मी आजही माझ्या विधानावर ठाम आहे. नितीश कुमार यांनी १.५ कोटी महिलांना दिलेले २ लाख रुपये हस्तांतरित केले आणि ते मते विकत घेऊन जिंकले नाहीत हे सिद्ध केले, तर मी कोणत्याही ‘जर आणि पण’शिवाय राजकारण निश्चितच सोडेन, अशी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०,००० रुपयांना ६०,००० मते खरेदी केली
जर प्रत्येक मतदारसंघातील ६०,००० हून अधिक लाभार्थ्यांना १०,००० रुपये दिले नसते तर जेडी(यू) कोटा फक्त २५ जागांपर्यंत मर्यादित राहिला असता. नीतीश कुमार आणि त्यांच्या विजयात, फक्त एकच गोष्ट आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०,००० रुपयांना ६०,००० मते खरेदी केले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आम्ही चुका सुधारू, स्वतःला घडवू आणि पुन्हा मजबूत होऊ
विधानसभा निवडणुकीनंतर निकालानंतर आम्हाला धक्का बसला, पण आम्ही चुका सुधारू, स्वतःला घडवू आणि पुन्हा मजबूत होऊ. आमच्यासाठी मागे हटण्याचा पर्याय नाही, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी रालोआने अभूतपूर्व विजय मिळवला. नितीश कुमार यांच्या जद(यू) पक्षाने १०१ जागांपैकी ८५ जागा जिंकल्या आणि त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष भाजपने ८९ जागा जिंकल्या आहेत. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला शून्याचा भोपळालही फोडता आला नाही त्यांच्या पक्षाची पाटी कोरीच राहिली आहे.


