राष्ट्रवादीच्या आमदाराचे बंड; भाजपच्या माजी खासदाराचीही साथ !
विदर्भातील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी तुटली आहे. सर्वच पक्षांनी आपआपले उमेदवार उभे केले आहेत. तसेच सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे.
असे असले तरी स्थानिक नेते बंडखोरी मानायला तयार नाहीत. सर्व बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात वेगळेच चित्र बघायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे, त्यांच्या पत्नी तसेच भाजपचे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराच्या रॅलीत सहभागी होऊन त्याला उघडपणे समर्थन जाहीर केले आहे. हे बघता राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांवरून पक्षात मतभेद असल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील तुमसर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अभिषेक कारेमोरे आणि भाजपने प्रदीप पडोळे यांना नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. असे असताना जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांनी पक्षासोबत बंडखोरी केलेल्या उमेदवाराला उघड समर्थक दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे समर्थक आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद पुन्हा उफाळून आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. भंडारा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आमदार आणि भाजपचे माजी खासदारच तुमसरमध्ये बंडखोराच्या पाठीशी उभे झाले असल्याने तुमसरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी युवा तहसील अध्यक्ष सागर गभने यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसने अभिषेक कारेमोरे आणि भाजपाने प्रदीप पडोळे यांना तिकीट दिल्याने मोठा असंतोष उफाळून आला आहे. चार दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांनी भंडारा आणि गोंदियातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले होते.
पटेल यांनी यावेळी कोणी स्वतःला बाहुबली समजू नये, असा इशारा दिला होता. असे असतानाही दोन बड्या नेत्यांनी त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. थेट बंडखोराला समर्थन जाहीर केले आहे. बंडखोराच्या रॅलीत सहभागी होत त्याला समर्थन दिल्याने भाजपमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. हे बंड बडे नेते कसे शांत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


