पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश !
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सीमेवर झालेल्या चकमकी, हवाई हल्ले आणि राजनैतिक विधाने पाहता, या दोन इस्लामी राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. आता पाकिस्तानने अधिकृतपणे तालिबान सरकारला “अंतिम संदेश” दिला असून, हा संदेश भविष्यातील मोठ्या लष्करी कारवाईचा संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अहवालानुसार, पाकिस्तानने तुर्कीच्या मध्यस्थीद्वारे अफगाण तालिबानला अल्टिमेटम दिला आहे. शाहबाज शरीफ सरकार आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने तालिबानला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या मागण्या मान्य कराव्यात आणि अफगाण भूमीवरून टीटीपी च्या हल्ल्यांना आळा घालावा. जर तालिबानने हे पाऊल उचलले नाही तर पाकिस्तान काबूलमधील सत्तेला उलथवून लावण्यासाठी कार्यरत असलेल्या इतर शक्तींना पाठिंबा देऊ शकतो. हा संदेश तालिबानसाठी केवळ इशारा नसून भविष्यातील मोठ्या संघर्षाची पूर्वसूचना मानली जात आहे.
तालिबानविरोधी गटांना पाकिस्तानचा गुप्त पाठिंबा?
काबूलचे भारताशी वाढते संबंध पाकिस्तानला त्रासदायक वाटत आहेत. त्यामुळे आता इस्लामाबाद तालिबानला “सुरक्षा धोका” मानत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अफगाणिस्तानातील अनेक विरोधी गटांना जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सुरक्षा व गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान सध्या खालील प्रमुख नेत्यांशी संपर्कात आहे:
हमीद करझाई
अशरफ घनी
अहमद मसूद
अब्दुल रशीद दोस्तम
Afghan Freedom Front चे सदस्य
नॉर्दर्न अलायन्सशी संबंधित कमांडर
या नेत्यांना पाकिस्तानने सुरक्षित ठिकाण, राजकीय समर्थन आणि त्यांच्या गटांना पाकिस्तान-आधारित कार्यालये देण्याची ऑफर केली असल्याचे समजते.
अफगाणिस्तान-पाकिस्तान तणावाचा मूळ मुद्दा: टीटीपी
पाकिस्तानचा दावा आहे की टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानातून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहेत. तालिबानचा दावा मात्र वेगळा आहे-ते म्हणतात की अफगाण जमिनीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध केला जाऊ देणार नाही. परंतु पाकिस्तान तालिबानवर विश्वास ठेवण्यास तयार नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा ‘काबूलवर हवाई हल्ल्यांची’ शक्यता व्यक्त केली आहे. तालिबाननेही स्पष्ट केले आहे की ते पाकिस्तानच्या दबावाखाली झुकणार नाहीत. त्यामुळे हा संघर्ष हळूहळू मोठ्या युद्धाच्या दिशेने जात असल्याची चिन्हे दिसत आहेत. दोन इस्लामी राष्ट्रांमधील हा संघर्ष आता भू-राजकीय सामर्थ्याच्या खेळात बदलला आहे. पाकिस्तान सत्तापालटाचा मार्ग निवडेल का किंवा तालिबान कठोर प्रतिकार करेल? पुढील काही आठवडे दक्षिण आशियातील राजकीय आणि सुरक्षा परिस्थिती ठरवणारे ठरू शकतात.


