भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं.?
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातच आता शिवसेनेची गळचेपी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, पदाधिकारीच गळाला लावल्याने हा वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर आता शिवसेनेचे शाखाप्रमुख हरेश महाडिक, उप विभागप्रमुख महेश लहाने यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याची तक्रार दिली.
पण, या प्रकरणावर भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार आरोप फेटाळले आहेत.
भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. हे प्रकरण चर्चेत असताना नारायण पवार यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला.
चुकीची माहिती देऊन गुन्हे दाखल करताहेत
नारायण पवार म्हणाले, “इथल्या नागरिकांना एक टक्का स्टॅम्प ड्युटी लागणार होती. आता ती १०० रुपये लागणार म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करायला गेलो होतो. त्या १८५ कुटुंबांसाठी मी मेहनत घेतली. तेव्हा कुणी आले नाही. आता स्टंटबाजी करायला आले आहेत.
तिथे कुठेच जल्लोष नव्हता. मी काही कुणाला मारहाण केली नाही. काही लोक आता चुकीची माहिती देऊन गुन्हे दाखल करत आहेत. आम्ही महायुतीमध्ये आहोत. युती झाली तर आम्ही युतीत लढणार आहोत. आम्ही वादावादी करणार नाही. नरेश म्हस्के जेव्हा खासदारकीसाठी उभे होते, तेव्हा आम्ही त्यांचा प्रचार केला होता”, असा खुलासा नारायण पवार यांनी केला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप काय?
बीएसयूपी घरांना शंभर रुपये नोंदणी शुल्क जाहीर करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी याचे सेलीब्रेशन करण्यासाठी गेले होते. पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये सेलिब्रेशन केले जाणार होते, पण, तिथे भाजप माजी नगरसेवक नारायण पवार आले आणि सेलिब्रेशन कसे करता म्हणत मारहाण केली? असा शिंदेंच्या तक्रार दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या प्रकरणावरून शुक्रवारी पडसाद उमटले. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या सुप्त संघर्षही यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.


