अंजली दमानिया; गौरी गर्जे प्रकरणात उपस्थित केले गंभीर सवाल…
भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या आत्महत्येने मोठा गदारोळ माजला आहे. केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी (दि.२२) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
त्यानंतर गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल करून वरळी पोलिसांकडून त्यांना आज (दि. २४) अटक करण्यात आली आहे. अशातच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंकजा मुंडेंवर टीका केली आहे. “पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला” असे म्हणत दमानिया यांनी गौरी गर्जे प्रकरणाबाबत गंभीर सवाल उपस्थित केले.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून रविवारी (दि. २३) एक निवेदन प्रसिद्ध करून घटनाक्रम सांगण्यात आला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, “माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला.तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले.” त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या निवेदनावर अंजली दमानिया म्हणाल्या, “पंकजा मुंडे यांचे कालचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला. संध्याकाळी ६.३० ते ६.४५ पीए अनंतचा फोन, दुसऱ्या पीएच्या फोनवर आला, तो खूप रडत होता, पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्यांनी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही पुढे काय केलं?” असा सवाल दमानिया यांनी विचारला.
तुमचा पुत्रासमान पीए नायर हॉस्पिटलमधून गायब…
पुढे त्या म्हणाल्या, “तुम्ही घटनास्थळी का गेला नाहीत, तुम्हाला जमत नव्हते, तर तुमच्या कार्यालयाकडून कोणी उपस्थित का नव्हते? तुमच्या कार्यालयाने हे पोलिसांना कळविले का? पुत्रासमान पीएला तत्काळ मदतीला का गेला नाहीत? असा सवाल अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंना विचारला. “तुमचा पुत्रासमान पीए नायर हॉस्पिटलमधून गायब का झाला? जर ही आत्महत्या होती तर सासरच्या लोकांपैकी एकही व्यक्ती का हजर नव्हते?” असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केले.
“लग्नात उपस्थित राहून ट्वीट केलंत, मग पत्नीचा मृत्यू झाल्यावर…
यासोबतच, अंजली दमानिया यांनी विचारलं की, “आई-वडील तरी ३.३० ला बीडहून मुंबईला पोहोचले, पण पोलिसांनी सकाळी ७ वाजेपर्यंत तक्रार का घेतली नाही? आपण पोलिस स्टेशनला येऊन, नायर हॉस्पिटलला येऊन, परिवाराची मदत का केली नाही? पुत्रासमान होता ना अनंत? सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलिस स्टेशनवर कोण गेले होते? याच्या चौकशीची मागणी तुम्ही करणार का? सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार का? सगळ्यात महत्वाचे म्हणजे, काल दुपारपर्यंत तुम्ही यावर काहीच का बोलला नाही? त्याच्या लग्नात उपस्थित राहून ट्वीट केलंत, मग पत्नीचा मृत्यू झाल्यावर संध्याकाळी ६.४५ पासून काहीच का बोलला नाहीत?” अशा प्रश्नांची सरबत्ती अंजली दमानियांनी केली. तसेच, “त्या पालवे कुटुंबाला तुमची मदत का झाली नाही” हे स्पष्ट करण्याची विनंती करत, “मला यात राजकारण आणायचं नव्हतं” असंही अंजली दमानिया यांनी नमूद केलं.
पंकजा मुंडे यांनी निवेदनात काय म्हटलं होतं?
पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, “काल दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० ते ६.४५ च्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला.तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दुःखात आहेत, हे मी समजू शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे.


