अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल – नरेंद्र महाराज
जगात अनेक ख्रिश्चन आणि मुस्लीम राष्ट्र आहेत. तसेच एक हिंदू राष्ट्र असायला नको का? त्यासाठी देशातील हिंदू समुदायाने जास्तीत जास्त अपत्ये जन्माला घातली पाहिजेत, असे वक्तव्य नाणीज येथील दक्षिण पीठ रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी केले.
हिंदूंची लोकसंख्या कमी होत राहिली तर भारतातील बहुसंख्य हिंदू (Hindu) संपुष्टात येतील, असे त्यांनी म्हटले. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू समाजाला किमान दोन अपत्य जन्माला घालण्याचे आवाहन केले.
भारतातील बहुसंख्य हिंदू लवकरच संपणार आहेत. आम्ही दोन आणि आमचं एक, असे हिंदू समाजाचे अपत्याबाबतचे धोरण आहे. मी हिंदू समाजाला आवाहन करतो की, तुम्ही दोन आणि किमान तुमची दोन मुलं असली पाहिजेत. तरच हिंदू धर्म टिकेल. तुम्ही एका अपत्याला जन्म देताय, हे चूक आहे. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे आणि मुस्लिमांची संख्या वाढत आहे. लोकशाहीत व्होटबँकेच्या राजकारणाला महत्त्व असते. या व्होटबँकेमुळे निवडून आलेल्या व्यक्तीला महत्त्व असते. त्यामुळे भारतामध्ये हिंदूंची संख्या वाढली पाहिजे. हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. तुम्ही देश, देव आणि धर्मासाठी काम केले पाहिजे. आमच्यासारखे धर्मगुरु तुम्हाला पाठिंबा देतील, असे नरेंद्र महाराज यांनी म्हटले.
तसेच आपली संस्कृती आपल्याला कळली नाही म्हणून आपण पुरोगामाच्या नावाखाली धिंगाणा घालतो. अध्यात्मातील विज्ञान आपल्याला कळालेलं नाही म्हणून आपला धिंगाणा सुरु आहे. मी याठिकाणी धिंगाणा हा शब्द जाणीवपूर्वक वापरत आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मनःशांती देऊ शकत नाही, ती शांती अध्यात्मच देऊ शकते. अध्यात्मात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक दृष्टिकोन आहे, हे पुरोगाम्यांना कळत नाही. पुरोगामीत्वाच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारण्याचं काम सुरू आहे. ती खरी दुर्बुद्धी आहे. जगात भारत हा एकमेव सक्षम देश आहे, जो संस्कृतीच्या माध्यमातून मनःशांती देऊन शकतो, असेही नरेंद्र महाराजांनी म्हटले.


