देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा !
मुंबईकरांच्या लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनचा लवकरच पूर्णपणे कायापालट होणार आहे. आता लोकल ट्रेनचे सर्व डबे मेट्रोप्रमाणे संपूर्ण वातानुकूलित AC करण्यात येणार आहे. तसेच या लोकलचे दरवाजे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) पद्धतीने बंद होणारे असतील, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ते युनायटेड नेशन्सचे भारतीय मॉडेल आयोजित युथ कनेक्ट सत्रात बोलत होते.
युनायटेड नेशन्सचे भारतीय मॉडेल (IIMUN) आयोजित युथ कनेक्ट सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात Involvement of Youth in Governance या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 5 वर्षात अनेक विकासात्मक बदल होणार आहेत अशी माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुंबईची जी लोकल आहे, ज्यातून साधारण ९० लाख लोक दररोज प्रवास करतात. त्यात आपण मोठा बदल करणार आहोत. आपण मेट्रो तर इतकी चांगली बनवली आहे. पण मुंबई लोकलमध्ये आजही लोक लटकून प्रवास करतात. यात जो खरा मुंबईकर आहे तोच प्रवास करू शकतो. ऐन गर्दीच्या वेळी बाहेरची व्यक्ती त्या लोकलमध्ये घुसूच शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मात्र आता आम्ही यात मोठा बदल करणार आहोत. आता आम्ही लोकलचे सर्व कोच हे मेट्रोप्रमाणे करणार आहोत. ते आता पूर्णपणे एअर कंडिशन असणार आहेत. त्याचे दरवाजे आता बंद होणार आहेत. आम्ही इतकी सुंदर लोकल बनवणार असलो तरी सेकंड क्लासचे तिकीट एक रुपयांनीही वाढणार नाही. तितक्याच तिकिटाच्या दरात तुम्हाला मेट्रो प्रवासाप्रमाणे अनुभव लोकल प्रवासात करता येणार आहे, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.
रोजचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायक
लोकल ट्रेनमध्ये दरवाज्यांवर लटकून प्रवास करताना होणारे अपघात आणि गर्दीमुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो स्टाईलचे एअर कंडिशन डबे आणि बंद दरवाजे यामुळे प्रवाशांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायक होईल, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबई शहरी परिवहन प्रकल्पाच्या (MUTP) माध्यमातून ही सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे जगातील सर्वाधिक गर्दीच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीपैकी एक असलेल्या मुंबई लोकलचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला जाणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.


