नगराध्यक्षांसह 17 सदस्यांच्या विजयानंतर ‘तिजोरी’ उघडणार…
माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आम्हाला मतदान केलं नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी प्रचार सभेदरम्यान केलं होतं.
त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी देखील अशाच प्रकारचे विधान केलं आहे.
काय म्हणाले होते दादा?
माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी बोलताना अजित पवार यांनी आमचे 18 उमेदवार निवडून द्या, तुम्ही सांगाल ते करेन, पण काट मारलीत तर मीही काट मारीन. तुमच्या हातात मताचा अधिकार आहे, तसा माझ्याकडे निधीचा आहे, असा इशारा मतदारांना दिला होता. त्यावरून त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत आहे.
वळसे पाटलांचे पावलावर पाऊल
दिलीप वळसे पाटलांनीही अजितदादांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. मंचर नगरपंचायतीत आमचे नगरसेवक निवडून दिले तर या ठिकाणी विकासनिधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते
नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक भरघोस मतांनी निवडून द्या. मग मंचरमध्ये विकासनिधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून शंभर कोटीचा निधी आपण या भागासाठी मंजूर करून आणला आहे. मी आणले का तू आणले हा आमचा विषय नाही, गरज समाजाची आहे, त्यामुळे ही श्रेयाची लढाई नाही, असे वळसे पाटील म्हणाले.
एवढा मोठ्या प्रमाणात निधी आपण या ठिकाणी आणला आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला शब्द देतो की, या मंचर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मतांनी निवडून द्या निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.


