जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. आता मात्र ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जामनेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष बिनविरोध करण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून नियोजनबद्ध खेळी रचण्यात आली असून, हा प्रकार लोकशाहीची सरळ हत्या आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी केला आहे. याविरोधात सोमवारी (ता. २४) जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, तर महाविकास आघाडीच्या वतीने संतोष झाल्टे आणि पर्यायी उमेदवार म्हणून ज्योत्सना सुनील विसपुते यांनी अर्ज भरले होते. पण राज्य निवडणूक आयोगाने अचानक केलेल्या बदलामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार ज्योत्सना विसपुते यांचा अर्ज नामंजूर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर संतोष झाल्टे यांच्यावर दबाव आणून माघार घ्यायला लावल्याचाही आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते दिलीप खोडपे, उमेदवार ज्योत्सना विसपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील आरोप केले आहेत. ज्योत्सना विसपुते यांचे म्हणणे झाले की, निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी १७ नोव्हेंबरचे पत्र रद्द करून १८ नोव्हेंबरला नवीन सुधारित सूचना जारी केल्या. त्या सूचनांनुसार नोंदणीकृत पक्षांतर्फे सादर केलेल्या डमी उमेदवाराने एकच सूचक दिल्यास त्यांचा अर्ज बाद करावा; पण पाच सूचकांसह अर्ज दिल्यास त्याला अपक्ष म्हणून पात्र ठरवावे.
म्हणजे, आधी एकच सूचक बंधनकारक, तर दुसऱ्याच दिवशी पाच सूचकांची सक्ती. या दोन परस्परविरोधी आदेशांमुळे अनेक उमेदवारांना कोणताही पर्याय न राहता अर्ज बाद झाले. या मनमानीविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना सत्ताधाऱ्यांकडून माघारीसाठी धमकावण्यात आले. काहींवर सतत नजर ठेवण्यात आली आणि काहींना घरातून उचलून नेऊन दबाव टाकून पक्षात प्रवेश करून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप श्री. खोडपे यांनी केला. अशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणे म्हणजे लोकशाही गाळात जाणे आहे, अशी टीका त्यांनी केली.


