30 वर्षात कधीच असं घडलं नाही, आता हातात फक्त 1 संधी…
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका मायदेशात खेळली जात आहे. त्यामुळे टीम इंडिया या सीरीजमध्ये वर्चस्व गाजवेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण इथे उलटं घडल आहे. मायदेशात घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडिया बॅकफूटवर आहे.
भारतीय संघाची लाजिरवाणी स्थिती झाली आहे. ही सीरीज दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने पूर्णपणे एकतर्फी वाटत आहे. भारतीय फलंदाज संपूर्ण सीरीजमध्ये संघर्ष करताना दिसतायत. दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात भारतीय टीमने आतापर्यंत एकदाच 200 धावांचा टप्पा पार केला आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे भारताकडून एकही फलंदाज शतकी खेळी साकारु शकलेला नाही. फक्त यशस्वी जैस्वालने एक अर्धशतक झळकावलं. गुवाहाटी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये तो 58 रन्सवर आऊट झाला.
या सीरीजमध्ये टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरपासून मिडिल ऑर्डरपर्यंत सर्वच फलंदाज फ्लॉप ठरले. सीरीजमध्ये केएल राहुलच्या सर्वाधिक धावा 39 आणि ऋषभ पंतच्या 27 धावा आहेत. रवींद्र जाडेजाचा बेस्ट स्कोर 27 आहे. ध्रुव जुरेलमध्ये एकदाही 20 धावांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. वॉशिंग्टन सुंदर 48 धावांची इनिंग खेळला. भारताकडून सर्वाधिक धावा करणारा सुंदर एकमेव फलंदाज आहे. दोन कसोटीत 3 डावात मिळून त्याने आतापर्यंत 108 धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय सीरीजमध्ये एकही फलंदाज तीन डावात मिळून 100 धावांपर्यंत पोहोचू शकलेला नाही.
..तर 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडेल
टीम इंडियासाठी शतक झळकावणं कठीण होऊन बसलय. कारण एकही फलंदाज खेळपट्टिवर जास्तवेळ टिकत नाहीय. आतापर्यंत सीरीजमध्ये भारतीय टीमला फक्त एकदा फलंदाजाची संधी मिळाली आहे. गुवाहाटी टेस्टच्या चौथ्या डावात एकाही भारतीय फलंदाजाने शतक झळकावलं नाही, तर भारतात खेळल्या गेलेल्या कुठल्याही टेस्ट सीरीजमध्ये शतक न झळकवण्याची 30 वर्षातील ही पहिली घटना असेल.
दक्षिण आफ्रिकेला मात्र जमलं
दुसऱ्याबाजूला दक्षिण आफ्रिकेकडून या सीरीजमध्ये एक शतक लागलं आहे. गुवाहाटी टेस्टच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकन ऑलराऊंडर सेन्युरन मुथुसामीने शतक झळकावलं. त्याने 7 व्या नंबरवर उतरुन सेंच्युरी झळकवली. सेन्युरन मुथुसामीने 206 चेंडूत 109 धावा ठोकल्या. यात 10 चौकार आणि दोन षटकार होते.


