ज्येष्ठ नेत्याचा मित्रपक्षांना इशारा…
फलटणला दहशतीचे वातावरण आहे असे सांगितले जात आहे. पण शिवसेनेपुढे कोणाचीही दहशत चालणार नाही. उलट आमचीच सगळीकडे दहशत असते. एकनाथ शिंदेंनी शांततेने घ्यायला सांगितले आहे. म्हणून आम्ही शांत आहोत, पण यालाही काहीतरी संयम असतो, असे म्हणत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मित्र पक्षांना सूचक इशारा दिला.
येथील फलटण येथील श्रीराम मंदिर परिसरात फलटण पालिकेच्या प्रचारासाठी आयोजित शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या जाहीर सभेत देसाई बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवांजली राजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, सत्यजित राजे नाईक निंबाळकर, काँग्रेसचे प्रदेश सदस्य सचिन सूर्यवंशी बेडके, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, यांच्यासह माजी पदाधिकारी नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
देसाई म्हणाले, की फलटणच्या राजे परिवाराने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला याचा आनंद आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत राजे गटाला डावपेच सांगण्याची गरज नाही. लोकांची सेवा करण्याची परंपरा या कुटुंबाकडे आहे. एकनाथ शिंदे त्यासाठी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
दीपक चव्हाण म्हणाले, की फलटण तालुक्याला विकासाची दिशा दिली आहे. विकासाची अंमलबजावणी रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. फलटण शहर व तालुक्याच्या विकासासाठी सर्वजण शिवसेनेत गेले आहेत. आपल्याला इथली दहशत संपवायची आहे. यावेळी रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, रेश्मा भोसले, शरद कणसे, चंद्रकांत जाधव, अनिकेत राजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद नेवसे यांनी आभार मानले.
डॉक्टर आत्महत्याप्रकरणी कारवाई
फलटण येथील घटना दुर्दैवी आहे. याची सध्या चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ‘एसआयटी’ नेमलेली आहे. सरकारने याबाबत कडक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून सांगतो या प्रकरणात ज्या व्यक्तींचा संबंध आहे त्या व्यक्तीला पकडल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही. महिला डॉक्टरला ज्यांनी नियमबाह्य कृत्य करायला भाग पाडले त्यांना सोडणार नाही. मी शब्द देतो या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील प्रत्येक दोषींवर कडक कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही असाही इशारा शंभूराज देसाई यांनी या वेळी दिला.


