कोल्हापूर जिल्ह्यात या घडीला केवळ संधिसाधू राजकारण सुरू असून, राष्ट्रवादीला अर्थात ना. हसन मुश्रीफ यांना कागलात भाजप हवे होते. गडहिंग्लजला मात्र भाजपची साथ नको होती. चंदगडमध्ये तर वेगळीच भूमिका होती, असा आरोप करीत त्यामुळे भाजपलाही आपापल्या परीने निर्णय घ्यावे लागले.
ना. मुश्रीफांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचे मालक माझ्याकडे आहेत, असा खोचक टोलाही मंत्री पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला.
गडहिंग्लज येथील सभेत ते बोलत होते. या खोचक टीकेमुळे राष्ट्रवादी व भाजपमध्ये सध्या तरी सगळे आलबेल नसल्याचे दिसून येते. ना. पाटील म्हणाले, भाजपची ताकद जिल्ह्यात वाढत चालली असून, कदाचित त्याचाच परिणाम म्हणून काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणी बिघडली. चंदगडमध्ये आमचे आमदार असल्याने तेथे भाजपच्या चिन्हावर लढावेच लागणार होते. चंदगडला मात्र राष्ट्रवादीने आधीच आमच्याविरोधात लढण्याचे ठरविले असल्याने तिथली परिस्थिती वेगळी, गडहिंग्लजची वेगळी व कागलातील वेगळीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी काहीतरी नियोजन ठेवूनच घाटगे-मुश्रीफ युती केली असेल
कागलच्या युतीबद्दल बोलताना मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार व पुढचा विचार करणारे नेते आहेत. त्यांच्यासारखा दूरद़ृष्टीचा नेता महाराष्ट्राने आजवर पाहिला नसेल. त्यांच्या डोक्यात नक्कीच काही तरी असेल म्हणूनच त्यांनी समरजित घाटगे व हसन मुश्रीफ यांची युती केली असावी. फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला आम्ही हे असे का, म्हणून प्रश्न विचारूच शकत नाही. कारण, त्यांनी पक्षासाठीच वेगळे काही तरी नियोजन करूनच ही युती केली असेल, असेही त्यांनी घाटगेंच्या भाजपप्रवेशावर भाष्य केले.


