पुणे महापालिकेची भरती पुढे ढकलण्यासाठी ठाकरेंच्या खासदारासह रोहित पवारांनी लावली ताकद !
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी 1 डिसेंबर रोजी राज्यभरातील 20 शहरात ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 42 हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत.
मात्र याच परीक्षेच्या तारखा बदलाव्यात या मागणीसाठी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोर लावला आहे.
याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुणे महापालिका आयुक्त मागणी केली आहे. ओमराजे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील हीच मागणी लावून ठरली असल्याचे पहिला मिळत आहे.
याबाबत ओमराजे म्हणाले, पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी 1 डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.
त्यातच 2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार 1 तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे.
हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी, असं ओमराजे म्हणाले. रोहित पवार यांनी देखील याबाबत एक्स वर पोस्ट केलं आहे. रोहित पवार म्हणाले,पुणे महानगरपालिके अंतर्गत घेण्यात येणारी कनिष्ठ अभियंता परीक्षा 1 डिसेंबरला घेण्यात येत आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना 300-400 कि.मी. लांब परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळं दुसऱ्या दिवशी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानासाठी विद्यार्थी पोहोचू शकणार नाहीत, शिवाय आधीच शासकीय सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटी असल्याने त्यांनादेखील ही परीक्षा देता येणार नाही.
याशिवाय परीक्षेत पारदर्शकता राहण्यासाठी ही परीक्षा टीसीएस सेंटरवरच आयोजित करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. ही बाब लक्षात घेत शासनाने सदर परिक्षा पुढे ढकलावी आणि निवडणूक संपताच आठवड्याच्या आत ही परीक्षा टीसीएस सेंटर वर घेऊन व विद्यार्थ्यांचं होणारं संभाव्य नुकसान टाळावं, अशी आमची मागणी असल्याचं रोहित पवार म्हणाले.


