पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते दिलीप वळसे पाटील यांनी भर कार्यक्रमात आपली खंत बोलून दाखवली. राज्यात आपलं वजन कमी झाल्याची खंत दिलीप वळसे पाटील यांनी बोलून दाखवली.
त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. ते पिंपरी दुमला गावात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना गावातून कमी मतदान झालं. तसेच विधानसभा निवडणुकीत आपल्याला गावातून कमी मतदान झालं, अशी देखील खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
“या वेळेला काय झालं ते माझं मलाच कळलं नाही. म्हणजे जास्त नाही, पण माझं राज्यात थोडं वजन कमी झालं”, अशी खंत दिलीप वळसे पाटील यानी व्यक्त केली. “तुम्ही सांगितलं तसं विकासकामांसाठी पैसे दिले. मला तुम्ही जसं निवडून दिलं तसं अमोल कोल्हे यांनाही निवडून दिलं होतं. त्यांनीही गावात बरीच कामे केली असतील”, असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला.
अमोल कोल्हे यांनी एक रुपयाचंही काम केलं नाही तरी कालच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही तुमच्या गावामधून अढळराव पाटील यांच्यापेक्षा 291 जास्त मते दिली. ज्यांनी काम नाही केलं त्याला तुम्ही पाठिंबा दिला. आढळराव काम करत होते. तुमच्यात येत होते. बसत होते. त्यांचा पराभव झाला”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
“माझा हात मोडला आणि मला लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारात बाहेर येता आलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीतही जेवढं लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. याचाच फायदा ज्यांना आम्ही 10 वर्षे कारखान्याचं चेअरमन केलं. 8 वर्षे मार्केट कमिटीचं सभापती केलं. मान, सन्मान दिला. आता अपेक्षा असणं हे स्वभाविक आहे. पण त्या काळात देश, राज्यस्तरावरचं बदलेलं राजकारण त्याचा फटका बसला आणि मला पिंपरी दुमला गावाने 42 मतांनी मागे ठेवलं. ठिक आहे. मी नाराज झालो नाही, असं दिलीप वळसे पाटील आपल्या भाषणात म्हणाले.


