शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर राज्यात भाकर फिरणार ?
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षाचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता.
त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते. त्यांनी अमित शाह यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली होती. त्यानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या एका मंत्र्याने एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार
शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे नंदुरबारमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जनतेला आजही विचारलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? जनता ही सांगेल की एकनाथ शिंदे. महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. काळजी करू नका परत या महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करताना आपण सर्वजण पाहणार आहोत.
एकनाथ शिंदे प्रत्येक माणसाला भेटतात
अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झोपडीतून आलेला माणूस मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जात नव्हता. एकनाथ शिंदे प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय झोपायलाही जात नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब प्रत्येक सभेत सांगतात महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिला नव्हता असं म्हणत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची भविष्यवाणी दादा भुसे यांनी केली आहे.
नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनाच भगवा झेंडा फडकणार
पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले की, ‘नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनाच भगवा झेंडा फडकणार. आपल्या विरोधात असलेले नेते आता आपल्या सोबत आहेत. नगरपालिकेचा विकास करायचा आहे. काळजी करायचं काही काम नाही कारण नगरविकास विभाग एकनाथ शिंदे कडे असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी लागणारा निधी निश्चितपणे उपलब्ध होईल.
दरम्यान, दादा भुसे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले होते. आता भुसे यांच्या विधानानंतर राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे येणार का? याचे उत्तर आपल्याला भविष्यात मिळणार आहे.


