नितेश राणेंचा प्रचार सभेत सनसनाटी दावा; केसरकरांचा पलटवार म्हणाले…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल असून तळकोकणाच्या राजकारणात मोठ्या हालचाली झाल्या आहेत. येथे सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला असून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजघराण्याने उडी घेतल्याने माजी मंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणे आमने-सामने आले आहेत. अशातच येथे प्रचारात भाजप नेते नितेश राणे यांनी केसरकर यांचे नाव घेत एक मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी ये अंदर की बात है, दीपक केसरकर हमारे साथ है… असे म्हटल्याने खळबळ उडाली आहे. यावरून केसरकर यांनी देखील आता पटलवार केला असून ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
सावंतवाडीत सध्या राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आली आहे. येथे युतीसाठी खासदार नारायण राणे आणि दीपक केसरकर यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र वडिलांचा आदेश न मानता भाजप नेते नितेश राणे यांनी स्वबळाचा नारा देत भाजप एकटा लढेल अशी भूमिका घेतली. तसेच श्रद्धाराजे भोसले यांचे नाव सावंतवाडी नगराध्यपदाचे उमेदवारी म्हणून घोषित केले. यावरून येथे युतीत वाद वाढला आहे.
अशातच आता नितेश राणे यांनी प्रचारादरम्यान केसरकर यांचे थेट नाव घेत एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी, सावंतवाडी राजघराण्यातील श्रद्धाराजे भोसले यांनी भाजपच्या तिकीटावर नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्याआधीही त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती.
त्यामुळे केसरकर यांनी पक्ष बाजूला ठेवून आपली मुलगी समजून त्यांना पाठींबा द्यायला हवा होता. असो सध्या ते आमच्या विरोधात लढत असले तरी त्यांचा छुपा पाठींबा आम्हालाच आहे. ‘अंदर कि ये बात है दिपक केसरकर हमारे साथ है’ असे वक्तव्य सावंतवाडीतील प्रचार सभेत नितेश राणे यांनी केले. आता या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान आता या वक्तव्यावर केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले असून मी आजारी असल्याचा गैरफायदा घेतला जातोय. मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून दिशाभूल केली जातेय. जे चुकीच आहे. त्यामुळे कोणीही कितीही दिशाभूल केली तरी जनतेने फसवून जावू नये. मला जर मत मागायचे असेल तर ते मी धनुष्यबाणाला मागेन असे म्हणत त्यांनी मतदारांनी देखील आपले मत धनुष्यबाणाला द्यावं असे आवाहन केलं आहे.
तसेच जिल्ह्याच्या निवडणूकीत भाजप-शिवसेना युती असली तरीही येथे युती नाही. यामुळे माझ्या नावाने मते मागणे ठीक नाही. तरीही माझ्या नावावर मते मागून लोकांमध्ये गैरसमज का पसरवता असाही सवाल केसरकर यांनी करताना मला राजकीय दृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न सावंतवाडी केला जात असून तो जनताच हाणून पाडेल असाही दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर यावेळी नारायण राणे यांनी नितेश राणेंनी दिलेल्या आर्शीवादावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार नारायण राणेंनी युतीसाठी प्रयत्न केले मात्र येथे युती झाली नाही. त्यामुळेच ते आता प्रचारापासून दूर आहेत का अशी विचारणा त्यांना पत्रकारांनी केली. यावर केसरकर यांनी बोलणे टाळले. तर निलेश राणे यांना राणेंनी कदाचित मुलगा म्हणून आर्शिवाद दिला असेल असा पलटवार देखील केसरकर यांनी केला आहे.


