अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार !
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून मोठे राजकीय नाट्य रंगले होते. अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप आमदार राजन पाटील आणि त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) च्या उज्ज्वला थिटे यांच्यात संघर्ष पेटला.
अर्ज दाखल करण्यापासून अर्ज बाद होण्यापर्यंतच्या २ दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना आपण उज्ज्वला थिंटेंच्या पाठीशी असल्याचे म्हटलं आहे.
अनगर नगरपंचायतीमध्ये पहिल्यादाच निवडणूक लागली होती. राजन पाटील यांचे अनेक वर्षांपासून असलेले वर्चस्व कायम ठेवत, नगरपंचायतीमधील १७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. नगराध्यक्षपदही बिनविरोध व्हावे यासाठी पाटील आग्रही होते आणि त्यांनी आपली सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली होती. या प्रयत्नांना उज्ज्वला थिटे यांनी आव्हान दिले. थिटे यांनी थेट अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे उमेदवारी मागून एबी फॉर्म मिळवला. मात्र, अर्ज दाखल करण्यापासूनच त्यांना प्रचंड अडथळे आले. शेवटी पोलिसांच्या संरक्षणात १७ नोव्हेंबरला त्यांनी अर्ज भरला. मात्र अवघ्या २४ तासांत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला.
अनगरमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संघर्षामुळे महायुतीमध्येच तणाव निर्माण झाला. या वादात थेट अजित पवार यांना ओढले गेले. राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटील यांनी या प्रकरणी अजित पवार यांना नाद करू नका असा इशारा दिला होता. यावर सोलापूरमधील एका सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी राजन पाटील यांच्या कुटुंबाचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली आणि कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली.
“प्रत्येकाचा एक काळ असतो. या जिल्ह्यामध्ये काही लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी चालल्या आहेत. उज्ज्वला थिटे यांच्यावर कसा प्रसंग आला ते तुम्ही बघितला. ही लोकशाही आहे. कुणालाही निवडणुकीला उभं राहता येतं. दमदाटी नाही करुन चालत. समाजामध्ये आज काही माणसं विकृती असल्यासारखी वागतात. दमदाटी करुन कायदा हातात घेऊन कुणाचेही भलं झालेलं नाही. कधीना कधी तो फुगा फुटला आहे आणि त्यांची वाट लागली आहे. हे फार काळ टिकत नाही. लोक संधी आली की अशा लोकांना खड्या सारखं बाजूला काढतात, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही तिथे सत्तेची उब घेण्यासाठी गेलो नाही. सत्तेचा वापर विकास कामासाठी कसा होईल यासाठी माझे प्रयत्न असतात. या सगळ्या दमदाटीबद्दल मला एकच आठवतं ते म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. त्यामुळे फार कुणी शहाणं समजू नये. कुणी अरे केले तर त्याला का रे सुद्धा करता येतं, असाही इशारा अजित पवारांनी दिला.


