आमदार संतोष बांगर यांच्या घरी पहाटे 100 पोलिसांची धाड; हेमंत पाटील यांची माहिती…
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंगोली जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे आमदार एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत. असं असतानाच आज कळमनुरी येथे मोठी घडामोड घडली आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाड टाकल्याचा दावा शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे. बांगर यांच्या घराची तब्बल 100 पोलिसांनी झाडाझडती केल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे. हेमंत पाटील हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख आहेत. त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला माहिती देताना संतोष बांगर यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकल्याचा दावा केला आहे.
“हिंगोली आणि कळमनुरी या दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष होणार आहेत. कार्यकर्ते अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहेत. पण समोरच्यांची पायाखालची वाळू घसरायला लागली आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात आलं आहे”, असं हेमंत पाटील म्हणाले.
आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती सकाळी पाच ते साडे पाच वाजता 100 पोलिसांनी जावून झाडाझडती घेतली. त्यांची 75 ते 80 वर्षांची आई आजारी असते. ती घरात असताना, पत्नी, लहान मुलं घरात असताना, अशा पद्धतीने घरातील सामान काढून बघणं, कपाटातील सामान काढून बघणं, हे अतिशय वाईट पद्धतीने झालं आहे”, अशी खंत हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
“खरंतर आमदार पद हे संविधानिक पद आहे. त्याला संविधानिक दर्जा आहे. अशा संविधानिक पदाच्या कार्यकर्ता असलेल्या आमदारावर धाड टाकायची असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. त्या पद्धतीची कोणतीही परवानगी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. मी स्वत: विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, कुठल्याही प्रकारचा मेल आलेला नाही. कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. परवानगी न घेता अशाप्रकारची धाड कुणाच्या सांगण्यावर टाकली?, असा सवाल हेमंत पाटील यांनी केला.
इथल्या स्थानिक आमदारांच्या दबावाखाली येऊन इथल्या पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच आम्ही दोन्ही जिल्ह्याचे आमदार या कारवाई संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत”, अशी माहिती हेमंत पाटील यांनी दिली.
“राज्यात आम्ही सत्तेत समान वाटेदार आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. अशावेळेस जो काही स्थानिक आमदाराचा दबाव पोलिसांवर आहे. पोलीस कशाप्रकारे स्थानिक आमदाराच्या दबावात राहून काम करतात, याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.
एखाद्या आमदाराच्या घरावर अतिरेक्यासारखी, गुंडासारखी झाडाझडती घेतली जात असतील तर ते कुणालाही सहन होणार नाही. कुणालाही राग येईल. अशावेळेस समोरुन आरोप होत आहेत. त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. माझी दोघांना विनंती आहे. निवडणूक काही काळापुरता आहे. लोक आपल्याकडे बघत असतात. आपण आपली पातळी न सोडता टीका-टीप्पणी केली पाहिजे. मी संतोष बांगर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणार आहे”, असंदेखील ते म्हणाले.


