शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा अजब सल्ला !
नगर परिषद निवडणुकीत प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडाला आहे. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीने नगर परिषद निवडणूक अधिक गांभिर्याने घेतल्याचे दिसत असून महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर टीका करण्यात गुंतले आहेत.
त्यातच आपल्या रांगडी आणि रोखठोक भाषणांसाठी ओळखले जाणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तृत्वाला तर भलताच बहर आला आहे. जाहीर सभांमधून ते अनेक वादग्रस्त विधाने करीत असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्येच चुळबूळ सुरु झाली आहे. त्यांची भगूर नगरपरिषदेतील शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी झालेली जाहीर सभा अशीच वादग्रस्त विधानांनी गाजली आहे.
भगूर नगरपरिषद निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना ठाकरे गटदेखील शिंदे गटाविरोधात आहे. शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरला आहे. अनेक वर्षांपासून भगूरवर शिवसेनेचे नेते विजय करंजकर यांचे वर्चस्व आहे. यावेळी त्यांच्या वर्चस्वाला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रेरणा बलकवडे यांना उतरवून हादरा देण्याची रणनीती आखली आहे. त्या विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांना लढत देत आहेत. भगूरवर शिवसेना शिंदे गटाने अधिक लक्ष दिले आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी भगूर येथे झालेल्या सभेत वादग्रस्त विधानांची मालिकाच लावली. त्यांनी शिंदे गटाविरोधात एकवटलेल्यांची खिल्ली उडवली. भगूर हा शिवसेनेचा गड आहे. पक्षाची ताकद आहे. लोकांशी संपर्क आहे. विरोधकांना त्यांची कमकुवत बाजू दिसल्यामुळे ते शिवसेनेला पराभूत करण्यासाठी एकत्र झाले. कितीही पक्ष एकत्र आले तरी भगूर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डोके भाजपचे, हात राष्ट्रवादीचे, पाय मनसेचे असे शरीर कसे चालेल. त्यांच्यात पायपोस राहणार नाही. पाच लोकांची टोळी कशासाठी असते, असा प्रश्न करीत त्यांनी भाजप, राष्ट्रवादी पवार गटाची खिल्ली उडवली. नगरपरिषदेसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. गुलाबराव पाटील यांनी एक डिसेंबरच्या रात्री मतदारांना घराबाहेर झोपडण्याचे आवाहन केले. त्याचे कारणही त्यांनी दिले. विधानसभा निवडणुकीआधी जशी लक्ष्मी आली होती, तशी आताही येणार आहे. त्यामुळे एक डिसेंबरच्या रात्री घराबाहेर झोपा, असा वादग्रस्त सल्ला त्यांनी दिला. भगूर येथील पाणीपुरवठा योजनेचा उल्लेख करीत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केले. विधानसभा निवडणूक प्रचारावेळी भगूर येथे अजित पवार यांनी पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली होती. त्यावरुन गुलाबरावांनी शहाण्यासारखे वागावे. दुसऱ्याचे पोर आपले म्हणू नये, असा चिमटा काढला.
नगरविकास खाते आपल्याकडे असून इस खाते मे माल हैं, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोणाकोणाला मोठे केले, याचे उदाहरण देताना गुलाबराव पाटील यांनी, छगन भुजबळ, नारायण राणे, चंद्रकांत खैरे आधी कोणते व्यवसाय करीत, ते सांगितले. शिंदे गटाचे पदाधिकारी विजय करंजकर यांनी सभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक आमदार सरोज अहिरे यांच्यावर टिकास्त्र सोडले.


