ठाणे-प्रतिनिधी- नागेश पवार
ठाणे ( 31) – 15 जानेवारी रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन (स्वीप) कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत विभागीय क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी आम्ही मत देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या घोषवाक्याखाली मतदानाची जनजागृती केली.
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या सूचनेनुसार उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या सहकार्याने नौपाडा–कोपरी प्रभाग समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा सावंत आणि उथळसर प्रभाग समिती निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या पुढाकाराने स्वीप पथकाच्या वतीने नौपाडा–कोपरी प्रभाग समिती आणि उथळसर प्रभाग समिती अंतर्गत या मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन वीर सावरकर मैदान येथे करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व रुजवणे तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी “आम्ही मत देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या!”, “मतदान करा, लोकशाहीचा विजय करा” अशा प्रभावी घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले. मतदानाच्या दिवशी सुट्टीचा गैरवापर न करता सहलीस जाणे किंवा घरी न थांबता मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी भावनिक संदेशांच्या माध्यमातून पालकांना केले.
विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन विविध घोषणांद्वारे प्रामाणिक व निर्भय मतदानाचा संदेश दिला. “मतदान करा, मतदान करा, लोकशाहीचा विजय करा” या संकल्पनेतून सर्व नागरिकांनी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी न चुकता मतदान करावे, असे प्रेरणादायी आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमामुळे लहान वयातच लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असून नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे चित्र दिसून आले.
