कोल्हापूर प्रतिनिधी पंडित चौगुले
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीनंतर नूतन महापौर व उप-महापौर यांची निवड प्रक्रिया शुक्रवार, दि. 06 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेमध्ये संपन्न होणार आहे. सदर निवडणूक जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या तयारीची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज महापालिकेत पाहणी केली. यावेळी त्यांनी सभागृहात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाची, नूतन नगरसेवकांच्या प्रवेश व्यवस्थेची, पत्रकार व नगरसेवकांसाठी करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेची तसेच इतर अनुषंगिक सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान पीठासन अधिकारी यांच्यावतीने उप-जिल्हाधिकारी संपत खिलारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागामार्फत महापालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बाजारगेट हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून, या मार्गावर केवळ नगरसेवक व पत्रकारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच काळाईमाम तालीम जवळील ब्रेकफास्ट वडा सेंटर येथून महापालिकेकडे येणारा रस्ता तसेच बाजारगेट पोलीस चौकीजवळील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. बाजारगेट परिसरात फक्त पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर व नूतन सदस्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार निवडणूक विषयक कामकाज आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत राबविले जाणार आहे. नूतन सदस्यांनी मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (EPIC), पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी कोणताही एक ओळख पुरावा सोबत आणणे अनिवार्य आहे. सभागृहात नूतन सदस्यांना सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सदस्य, मतदार व पत्रकारांना प्रवेश देण्यात येईल. इतर कोणत्याही व्यक्तींना प्रवेशास बंदी आहे.
