जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आज फैसला!
14 टेबलांवर मतमोजणी; ईट–सुकटा–पाथरूड–वालवड–आष्टा गटांवर लक्ष:
सत्तेची चावी कोणाच्या हाती?
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
भूम/ धाराशिव | प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा आज निर्णायक दिवस उजाडला असून, संपूर्ण भूम तालुक्याचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. अनेक दिवस चाललेल्या प्रचारानंतर मतदारांनी दिलेला कौल आज स्पष्ट होणार असून, सत्ता कोणाच्या पारड्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
भूम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण 14 टेबलांवर 10 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावर प्रशासनाची लगबग सुरू असून,उमेदवार व समर्थकांमध्ये उत्साहासोबतच तणावाचे वातावरण असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
या निवडणुकीत ईट, सुकटा, पाथरूड, वालवड आणि आष्टा या गटांमध्ये अटीतटीची लढत झाल्याने सर्वांचे लक्ष या मतदारसंघांकडे लागले आहे. काही ठिकाणी सरळ लढत तर काही गटांत त्रिकोणी व चौरंगी संघर्ष झाल्याने निकाल शेवटच्या फेऱ्यांपर्यंत रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असून, काही पारंपरिक गडांमध्येही समीकरणे बिघडल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बंडखोरीचा फटका कुणाला बसणार आणि कुणाला त्याचा फायदा होणार, हे चित्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागातील मतदारांनी पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीजपुरवठा, शेती व शेतकरी प्रश्न या मूलभूत मुद्द्यांवर मतदान केल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा उमेदवाराची स्थानिक कामगिरी, विश्वासार्हता आणि जनसंपर्क निकालात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
हा निकाल केवळ जागांचा नसून, तो जिल्ह्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.
या निकालाचा थेट परिणाम आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर होणार असून, स्थानिक राजकीय समीकरणांत मोठे परिवर्तन घडवणारा ठरण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी गट सत्ता कायम राखणार की विरोधकांना पुनरागमनाची संधी मिळणार, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
