पै. गणेश बोत्रे व आश्वनिताई तरस यांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण
खेड : प्रतिनिधी
बद्रीनारायण घुगे
खेड तालुक्यातील म्हाळुंगे–नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पै. गणेश कांताराम बोत्रे पाटील आणि पंचायत समिती सदस्यपदी आश्वनिताई सोमनाथ तरस यांनी भरघोस मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. या विजयासह राष्ट्रवादी काँग्रेसने या गटातील आपला बालेकिल्ला कायम राखला असून, संपूर्ण तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गटाच्या निकालाकडे पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील जनतेचे विशेष लक्ष लागले होते. निकाल जाहीर होताच खेड तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
विजयानंतर खेड–आळंदीचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते यांनी पै. गणेश बोत्रे व आश्वनिताई तरस यांचा सत्कार करून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नाणेकरवाडी येथील तळेगाव चौकात ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भंडारा उधळत पै. गणेश बोत्रे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यानंतर त्यांनी खराबवाडी, म्हाळुंगे, खालुब्रे येथील ग्रामदैवत जोपाईदेवीचे दर्शन घेतले. तसेच येलवाडी येथील संत भागीरथी माता दर्शन घेऊन सांगुर्डी प्लॉटिंग, इंद्रायणी रिव्हर पार्क सोसायटी परिसरात भेट दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती दिसून आली.
“गणेश दादा एकच वादा” या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
यावेळी येलवाडीचे सरपंच तथा खेड बाजार समिती सदस्य रणजित गाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. येलवाडी, सांगुर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयानंतर संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.
