पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी
पालघर : ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाचा आणि उद्योजकतेचा उत्सव ठरणाऱ्या ‘पालघर मिनी सरस २०२६’ या जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन शिरगाव बीच, पालघर येथे १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर यांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत मेळावा नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
या मेळाव्यात महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, घरगुती मसाले, ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच अन्य हस्तनिर्मित उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रदर्शनात पालघर जिल्ह्यातील ७३, रत्नागिरी १२, ठाणे ७, रायगड ५, पुणे २ तसेच नाशिक, जळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका अशा एकूण १०२ स्वयंसहायता समूहांचा सहभाग राहणार आहे. सुमारे ८० स्टॉल हस्तकला व इतर उत्पादनांचे तर २० स्टॉल खाद्यपदार्थ विक्रीचे असतील. महिलांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष व आरोग्य कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांतील प्रदर्शनांमध्ये दरवर्षी अंदाजे १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल झाली होती, तर १० ते २० हजार नागरिकांनी भेट दिली होती. यंदा हा उपक्रम ‘ग्लोबल कोकण महोत्सव’सोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात येत आहे. मुंबई व परिसरात या महोत्सवाला मोठी ओळख असून दरवर्षी सुमारे एक ते दोन लाख नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे यंदा महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे महिलांना स्वतःचा ग्राहकवर्ग निर्माण करण्यास तसेच वर्षभर विविध संस्था व ग्राहकांकडून ऑर्डर्स मिळण्यास मदत होणार आहे.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे शासनाचे महत्त्वाचे ध्येय असल्याचे सांगत जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड तसेच जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी नागरिकांना १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
