दैनिक.चालु वार्ता उदगीर, प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर शहरातील अत्याधुनिक बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती उदगीर–जळकोट मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. त्यांनी मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निधी मंजूर झाला आहे.
गेल्या वर्षभरापासून उदगीर बसस्थानकाचे काम सुरू असले, तरी काही मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने तसेच महामंडळाच्या एस.टी. बसांची कमतरता असल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत होती. विशेषतः उदगीर–जळकोट मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठी असून, सीमाभागातील तीन राज्यांच्या संगमावर असल्यामुळे उदगीर शहरात दररोज मोठी वर्दळ असते.
उपलब्ध बसांची संख्या अपुरी असल्याने काही गाड्या सतत गर्दीने धावत आहेत, तर काही बस नादुरुस्त किंवा मोडकळीस आलेल्या अवस्थेत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बसस्थानकाचे उर्वरित काम जलद गतीने पूर्ण करणे आणि बससेवा सक्षम करणे आवश्यक असल्याचे आमदार बनसोडे यांनी नमूद केले.
मंजूर निधीमुळे बसस्थानकातील प्रलंबित कामे पूर्ण होऊन प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी व कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच बसस्थानकाच्या कामाचा नियमित आढावा घेऊन उर्वरित प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
