दै.चालु वार्ता उदगीर, प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : लग्नसराईसारखी सजावट, अधिकाऱ्यांची लगबग आणि स्वागतासाठी उभे नागरिक — पण ज्यांच्यासाठी हा सगळा सोहळा होता तेच गैरहजर! अशी परिस्थिती मंगळवारी उदगीर रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाली. दक्षिण मध्य रेल्वे चे महाव्यवस्थापक (GM) श्रीवास्तव हे परली–विकाराबाद मार्गाच्या वार्षिक निरीक्षणासाठी येणार असल्याचे कळताच स्थानकावर मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र त्यांची विशेष गाडी उदगीर येथे न थांबता थेट बिदरकडे रवाना झाली.
लाखोंची सजावट, क्षणात फोल
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानकाची रंगरंगोटी, स्वच्छता, दुरुस्ती आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. कर्मचारी आणि अधिकारी गेल्या काही दिवसांपासून कामात गुंतले होते. स्थानकाचा झालेला कायापालट पाहून प्रवाशांनाही आश्चर्य वाटत होते. परंतु प्रत्यक्ष पाहणीच झाली नाही, त्यामुळे या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपेक्षांचा चुराडा
स्थानिक नागरिक, प्रवासी संघटना आणि प्रतिष्ठित व्यक्ती विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी पुष्पगुच्छांसह स्थानकावर उपस्थित होते. गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे, प्रलंबित सुविधा पूर्ण करणे आणि स्थानक विकासाबाबत चर्चा करण्याची त्यांची अपेक्षा होती. मात्र विशेष गाडी न थांबल्याने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
प्रशासन बचावात, नागरिक आक्रमक
स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नसली तरी “दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल” झाल्याचे अनौपचारिक कारण पुढे येत आहे. मात्र नागरिकांचा संताप ओसरण्याची चिन्हे नाहीत. “एवढी तयारी करूनही वरिष्ठ अधिकारी थांबणार नसतील, तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संतप्त प्रतिक्रिया
“आम्ही निवेदनांसह ताटकळत उभे होतो. स्थानक सजवून आमची दिशाभूल करण्यात आली. ज्यांच्यासाठी तयारी केली, त्यांनीच पाठ फिरवली. हा उदगीरच्या जनतेचा अपमान आहे,” अशी प्रतिक्रिया एका संतप्त प्रवाशाने व्यक्त केली.
घटनेनंतर उदगीरमध्ये प्रशासनाच्या नियोजनक्षमतेवर आणि संवादातील त्रुटींवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकारावर वरिष्ठ स्तरावरून अधिकृत स्पष्टीकरण येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
