विजयकुमार जेठे खेड तालुका प्रतिनिधी:
पुणे-नाशिक महामार्गावरील (जुन्या रस्त्याने) खेड घाटातील निसर्गरम्य परिसर सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अक्षरशः गुदमरू लागला आहे. घनदाट जंगल, वळणावळणाचा घाट आणि मनमोहक दृश्यांसाठी ओळखला जाणारा हा परिसर आता प्लास्टिक व टाकाऊ कचऱ्याच्या विळख्यात सापडून विद्रूप झाला आहे.
रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा उघड्यावर टाकण्यात आला असून, या कचऱ्यामुळे संपूर्ण परिसराची दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे हा भाग वनविभागाच्या ताब्यात असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा साचणे ही बाब वनविभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. वनसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेनेच या भागाकडे डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
कचऱ्यामुळे केवळ दुर्गंधी पसरत नाही, तर वन्यजीवांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होत आहे. प्लास्टिक व घातक कचरा खाल्ल्यामुळे प्राणी आजारी पडण्याचा धोका आहे. तसेच, या कचऱ्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून दीर्घकालीन हानी अटळ आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या या घाटाची अशी अवस्था होणे ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. “स्वच्छ भारत”सारख्या मोहिमा केवळ कागदावरच आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक प्रशासन, वनविभाग व संबंधित यंत्रणांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संपूर्ण परिसरातील कचरा हटवावा, जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
निसर्गाचा वारसा जपण्याऐवजी त्याची अशी उघडपणे होत असलेली नासधूस ही केवळ निष्काळजीपणा नसून, पर्यावरणाविरुद्धचा गुन्हाच असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
