समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील युवक, महिला व उद्योजक इच्छुकांसाठी आयोजित “स्थानिक सागरी किनारी समुदायांसाठी प्रमुख उपजीविका उपक्रम” या विषयावरील विशेष प्रशिक्षण शिबिर २४ फेब्रुवारी रोजी नाटे ग्रामपंचायत परिसरात उत्साहात पार पडले.
हा कार्यक्रम महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, जलजीविका आणि UNDP (GCF–ECCRIC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
विशेष अतिथी व्याख्याते म्हणून मिलिंद मिरकर (मिरकर एक्वा स्पोर्ट्स, रत्नागिरी) आणि प्रांजली चोप्रा (कम्युनिटी लाइव्हलीहुड तज्ज्ञ, पुणे) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वॉटर स्पोर्ट्स सुरक्षितता, आपत्कालीन उपाययोजना, किनारपट्टी भागातील लघुउद्योग व पर्यटन व्यवसायाच्या संधी तसेच मँग्रोव्ह (खारफुटी) संवर्धनावर आधारित शाश्वत उपजीविका याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच समुद्रकिनारी वावरताना घ्यावयाची आवश्यक काळजी व सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली.
या प्रशिक्षणात जलजीविका संस्थेचे चिन्मय दामले (जिल्हा टीम लीडर), रोहन गुरव (लँडस्केप प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, राजापूर), प्राज्योत कांबळे, सोनाली देसाई आणि संकेत मावळंकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला नाटेचे सरपंच संदीप बांधकर, माहिती अधिकार कार्यकर्ते समीर शिरवडकर, आंबोळगड येथील हॉटेल शांतादुर्गाचे मालक व व्यावसायिक विश्वास करगुटकर, त्रिवेणी फेडरेशनचे व्यवस्थापक राजन लाड, डिलाइट होमस्टेचे राकेश दांडेकर, जैतापूरचे माजी उपसरपंच प्रसाद मांजरेकर, विनायक ठाकूर, सचिन बांदकर तसेच रेशम लाड, मनीषा पाटील, जिज्ञासा गाव समिती नाटेच्या अध्यक्षा शर्वरी लाड, सिमरन मांजरेकर, श्रावणी नार्वेकर, मधुकर देवरुखकर, व्यावसायिक संदेश पाथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नाटे, जैतापूर, दळे, अणसुरे, आंबोळगड आदी भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. या प्रशिक्षणामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित जलक्रीडा, पर्यावरणपूरक पर्यटन आणि मँग्रोव्ह आधारित शाश्वत रोजगाराच्या नव्या संधींबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
