दैनिक चालू वार्ता रिसोड शहर प्रतिनिधी विजय जुंजारे.
रिसोड : येथील डॉ. आटोळे हॉस्पिटल अँड डेंटल केअर, रिसोड यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता महांदा-जिरवणकर कॉम्प्लेक्स, लोणी रोड, रिसोड येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमात तब्बल ८१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच समाजामध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने रुग्णालयातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. दिलीप धोपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजयप्रसाद तिवारी साहेब व डॉ. अशोक इंगोले साहेब उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून मा. तहसीलदार सौ. प्रतीक्षा तेजनकर, नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा, नगर परिषद उपाध्यक्ष विष्णू कदम आणि शिवसेना शहर अध्यक्ष अरुण मगर यांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करत अशा सामाजिक कार्यांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते, मान्यवर व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
