जामखेड, (प्रतिनिधी) – रोहयो अंतर्गत मंजूर वैयक्तिक सिंचन विहिरीस बेकायदेशीर स्थगिती दिल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक (रोजगार हमी योजना शाखा) येथील सह आयुक्त (रोहयो) यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांना स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर प्रकरणातील सर्व कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नान्नज (ता. जामखेड) येथील लाभार्थी अरुण बाबू साठे यांच्या रोहयो अंतर्गत मंजूर वैयक्तिक सिंचन विहिरीस तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतरही स्थगिती देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात पंचायत समिती, जामखेड येथील विद्यमान गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) यांच्यावर नियमबाह्य कारवाई केल्याचा आरोप आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे दिशाभूल करणारे अहवाल सादर केल्याची बाबही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
अरुण साठे हे अनुसूचित जाती (हिंदू मांग, SC-46) प्रवर्गातील शेतकरी असून त्यांच्या शेतात पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची सुविधा नसल्याने जमीन पडीक पडण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या तीन वर्षांपासून संबंधित कार्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर कामास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यानंतर स्थगिती देणे नियमबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे पदाचा गैरवापर व पक्षपाती कारवाईची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सह आयुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी किमान अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या चौकशीतून सत्य समोर येऊन लाभार्थ्यास न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

