वसमत प्रतिनिधी- बालाजी अडकिने
वसमत तालुक्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य तलावाच्या खोलीकरणाच्या कामादरम्यान अचानक एक मोठे भुयार (सुरंग) सापडल्याने शहरात चर्चा रंगली आहे. हे भुयार नेमके कशासाठी आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही.
या तलावाच्या खोलीकरणासाठी वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी सुमारे 1.36 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण व्हावे आणि वसमत शहराला पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी काम जलद गतीने सुरू आहे.
काम सुरू असतानाच भुयार उघडकीस
तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना अचानक जमिनीखाली भुयारासारखी रचना आढळली. यानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
काही जण याला जुन्या काळातील गुप्त मार्ग मानत आहेत.
काहींच्या मते, हे पाण्याचा निचरा करण्यासाठी केलेले जुन्या पद्धतीचे मार्ग (ड्रेनेज टनेल) असू शकते.
तर काहींनी तर “खजिन्याची खान” अशीही चर्चा सुरू केली आहे.स्थानिक वडीलधाऱ्यांच्या मते, पूर्वी तलावातील अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी अशा प्रकारचे भुयार तयार केले जात असत.
प्रशासनाकडून तपास अपेक्षित
सध्या या भुयाराबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नसली तरी, संबंधित विभागाने तांत्रिक तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा तलाव अत्यंत महत्त्वाचा असल्याने कोणतीही अफवा पसरू नये, यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर निवेदन देणे गरजेचे आहे.
दरम्यान, खोलीकरणाचे काम सुरू असून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. शहरातील अर्ध्या वसमतला पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावामुळे नागरिकांचे लक्ष सध्या या “गूढ भुयारा”कडे लागले आहे.
