ठाणे प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा : समाजसेवेचा व स्वच्छतेचा संदेश देणारे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवा येथील आगासनगाव परिसरात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. “स्वच्छता हीच सेवा” या त्यांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत उतरवत स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प केला.
या अभियानात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, नगरसेवक दीपक जाधव, तसेच समाजसेवक विजय कुऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वतः झाडू हाती घेत स्वच्छता करत नागरिकांना प्रेरणा दिली.
अॅड. रोहिदास मुंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश हा केवळ अभियानापुरता मर्यादित नसून तो आपल्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता केली, पण ही सवय कायम ठेवणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल.”
नगरसेवक दीपक जाधव यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे.”
या स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिक, युवक व श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याची प्रेरणा घेत दिव्यातील हे अभियान केवळ एक उपक्रम नसून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची एक चळवळ ठरत असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
