प्रतिनिधी : स्वाती हडकर
चिपळूण : स्मारकाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आमदार निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “स्मारकाबाबत आम्हाला कोणी शिकवू नये,” असा इशारा देत त्यांनी विरोधकांवर राजकारण केल्याचा आरोप केला.
स्मारकासाठी ३० एकर जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करत राणे म्हणाले की, सरकार प्रत्यक्ष पावले उचलत आहे.
“स्मारकासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण केली जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
निधीच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, “मी स्वतः ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
स्मारकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.” सरकार या विषयात गांभीर्याने काम करत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानाबाबत कटिबद्ध असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांकडून चुकीचे चित्र रंगवले जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, स्मारकाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि महायुती आमनेसामने आले असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या वादामुळे आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
