प्रतिनिधी/ स्वाती हडकर
हर्षवर्धन सपकाळ यांनी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची पाहणी करत सरकारवर जोरदार टीका केली.
छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्याची मागणी करत त्यांनी सरकारला दिलेला शब्द पाळण्याचे आवाहन केले.
सरकारने स्मारकाबाबत घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “घोषणा होतात, पण काम मात्र सुरू होत नाही,” असे सांगत त्यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रकल्पाचे उदाहरण दिले. त्याप्रमाणेच संगमेश्वरमधील संभाजी महाराज स्मारकाचे कामही रखडल्याची टीका त्यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त करत त्यांनी किल्ले संवर्धन आणि स्वराज्याच्या इतिहासाच्या जतनावर भर दिला. सरकारची या विषयात ठोस भूमिका दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी करत “अडचण निधीची नाही, इच्छाशक्तीची आहे,” असे सपकाळ म्हणाले.
