मोहोळ: तालुका ग्रा. प्र. (राज खरात)
मोबाईल वापरण्यास न दिल्याने तेरा वर्षाच्या लहान मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक व चिंताजनक घटना मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात घडली आहे.
यशराज धर्मराज डोके असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. मुलाचे आई-वडील शेती करून उपजीविका करतात. सायंकाळी शेतातून घरी आले असता घराला आतून कडी होती. ही कडी उघडत नसल्याने कुटुंबीयांनी लोखंडी रॉडने कडी तोडून दरवाजा उघडला असता आत मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते. घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.
लहान मुला मुलींसाठी मोबाईल हा घातक आहे हे अनेक वेळा घडलेल्या घटनांवरून सिद्ध झाले आहे. मात्र मुलं-मुली या मोबाईलच्या विळख्यात इतकी घट्ट सापडतात की त्यांना बाहेर काढणं पालकांना खूप अवघड जात आहे यावर सर्वांनी विचार करण्याची वेळ आली आहे.
मुला मुलींना मोबाईलच्या ऐवजी मैदानी व बौद्धिक खेळामध्ये कशी आवड निर्माण होईल याबाबत शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्था, शिक्षक व पालक यांनी लक्ष दिले पाहिजे तरच येणारी पिढी क्रियाशील बनेल.
