दै.चालु वार्ता वृत्तसेवा उदगीर, प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : “जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या अडचणी दूर करून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भविष्यात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही,” असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील नवीन शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीस उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे, तहसीलदार राम बोरगावकर, राजेश लांडगे, उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, प्रा. दिलीपकुमार मटके, डॉ. दीपक सोमवंशी, ज्ञानेश्वर बिरादार, यमुनाजी भुजबळे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार बनसोडे यांनी शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा सखोल आढावा घेतला. बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष स्थिती, निधीची उपलब्धता, प्रलंबित कामे, अतिक्रमण हटविण्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण तसेच अंमलबजावणीतील अडथळे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांची प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, कामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये आणि प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील शेती रस्ते सुकर करणे आणि शेती उत्पादनाला बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असावे, असेही त्यांनी नमूद केले.
