दैनिक चालू वार्ता रिसोड शहर प्रतिनिधी : विजय जुंजारे
रिसोड : पवित्र रमजान महिन्यात येथील महावितरण कर्मचारी शेख राहील यांच्या कन्या अज़्बा (वय ९ वर्षे) व फबिहा (वय ७ वर्षे) यांनी दिनांक २८ फेब्रुवारी रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लहान वयातच श्रद्धा, आत्मविश्वास आणि अल्लाहवरील अपार प्रेम यांचे सुंदर उदाहरण या दोघींनी घालून दिले आहे. “आम्ही पण रोजा ठेवणार,” अशी निरागस इच्छा त्या नेहमी आई-वडिलांकडे व्यक्त करत असत. यंदाच्या रमजानमध्ये त्यांच्या या इच्छेला पूर्णत्व मिळाले.
पहाटे सुमारे ४.३० वाजता दोघी स्वतःहून उठल्या. आई-वडिलांसोबत सहरी करून अल्लाच्या नावाने रोजाची नीयत केली. दिवसभर कोणतेही अन्न-पाणी ग्रहण न करता त्यांनी शिस्तबद्धपणे पाच वेळची नमाज अदा केली. संध्याकाळी सुमारे ६.३० वाजता त्यांनी रोजा पूर्ण केला.
एवढ्या लहान वयातही उपवासाचे नियम काटेकोरपणे पाळत त्यांनी संयम आणि शिस्त दाखवली. त्यांच्या या जिद्दीमुळे आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. मुलींच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी अल्लाकडे दुवा मागितली की, “या अल्लाह, माझ्या मुलींना शक्ती दे आणि त्यांचा हा रोजा कबूल कर.”
आजच्या बदलत्या काळात लहान मुलांमध्ये धार्मिक मूल्ये, मानवतेची जाणीव आणि ईश्वरावरील प्रेम जपले जात असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. अज़्बा व फबिहा यांच्या या कृतीमुळे शहरात कौतुकाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे अभिनंदन केले आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात पूर्ण केलेला हा पहिला रोजा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला आहे.
