दैनिक चालू वार्ता रिसोड -विजय जुंजारे
धोडप बु. (ता. रिसोड, जि. वाशिम जिल्हा) : येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष वामनराव बोडखे (वय अंदाजे ४६ वर्षे) यांनी दिनांक ३ मार्च २०२६ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे वाढते कर्ज, शेतीतील सततचे नुकसान, नापिकीची परिस्थिती तसेच मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे ते आर्थिक व मानसिक तणावाखाली होते. अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून होते. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असताना घरखर्च व शिक्षणाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यावर प्रचंड ताण निर्माण झाला होता, अशी माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली.
संतोष बोडखे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा व इतर कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत देण्याची व कुटुंबाला आधार देण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
ही घटना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधणारी ठरत आहे.
